महापालिकेला ५४,३८० लसमात्रा प्राप्त झाल्याने आज ३७,२५० मात्रांचे नियोजन

नवी मुंबई : करोना लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक लससाठा नवी मुंबई शहरासाठी मिळाला असून शनिवारी शंभर केंद्रांवर लसीकरण आयोजित केले आहे. ५४ हजार ३८० लसमात्रा मिळाल्या असून शनिवारी ३७ हजार २५० मात्रांचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्यांना लस मिळणार आहे.

नवी मुंबईत १८ वर्षांवरील १० लाख ८० हजार लोकसंख्या असून त्यांना प्रत्येकी आतापर्यंत १३ लाख ९२ हजार १२५  लसमात्रा देण्यात आली आहे. यात पहिली मात्रा ९ लाख ७० हजार ३१३, तर दुसरी मात्रा ४ लाख २१ हजार ८१२ जणांना गुरुवापर्यंत लस देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने दिवसाला ५० हजार जणांना लस देण्याची आमची तयारी असल्याचे शासनाला कळविले आहे. मात्र लससाठा मिळत नसल्याने कमी प्रमाणात व अनिश्चित लसीकरण सुरू आहे. गेल्या आठवडय़ात ७ सप्टेंबरला पालिकेला ४१,००० हजार इतक्या लसमात्रा मिळाल्या होत्या. त्यातून प्रशासनाने १०० केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात लसीकरण केले होते. त्यानंतर शुक्रवारी महापालिकेला ५४,३८० लसमात्रा मिळाल्या आहेत. या आतापर्यंतच्या सर्वाधिक असून त्यातून शनिवारी १०० केंद्रांवर ३७,२५० मात्रांचे लसीकरण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्राप्त लससाठय़ात ५०,००० कोविशिल्ड, तर ४३८० कोव्हॅक्सिन लसमात्रा आहेत. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिक तसेच ४५ वर्षांवरील करोनायोद्धे यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रथमच नेरुळ, वाशी, ऐरोली, तुर्भे येथील पालिका रुग्णालयांत सकाळी ७ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ ठेवण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्ड लशींची पहिली मात्रा दिली जाणार आहे.

३४४९ शुक्रवारी नवी मुंबईत विविध केंद्रांवर ३४४९ जणांना लसमात्रा देण्यात आल्या.

९८ तर शुक्रवारी पालिकेने अपंगांसाठी विशेष लसीकरण मोहीम आयोजित केली होती. त्यात ९८ जणांना लस देण्यात आली.

नवी मुंबई शहरात प्रथमच मोठय़ा प्रमाणात कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. प्राप्त लसमात्रांमधील एकाच दिवशी फक्त कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी ३७,२५० लसमात्रा १०० केंद्रावर शनिवारी दिल्या जाणार आहेत. पालिका रुग्णालयांत संध्याकाळी ९ वाजेपर्यंत लस दिली जाईल.

– डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख