साठा नसल्याने पालिकेचा नाइलाज; ‘कोव्हॅक्सिन’ची दुसरी मात्रा देणार

नवी मुंबई : राज्य सरकारकडून लशीचा साठा उपलब्ध न झाल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लसीकरण शुक्रवारी पूर्णपणे बंद पडले. त्यामुळे शुक्रवारी एकाही नागरिकाला लसीकरण करण्यात आले नसल्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी काही प्रमाणात असलेली  कोविशिल्ड लस गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्णत: संपली होती. ‘कोव्हॅक्सिन’ लशीची पहिली मात्रा घेणाऱ्या नागरिकांना मात्र या लशीची दुसरी मात्रा देण्यात येत आहे.

शहरात गुरुवारपासूनच शहरात लसीकरणाला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे गुरुवारी फक्त ३ हजार कुप्याच शिल्लक असल्याने शहरातील पालिकेच्या ऐरोली, वाशी तसेच नेरुळ येथील पालिका रुग्णालयात व तुर्भे येथील माता बाल रुग्णालयात लसीकरण करण्यात आले होते; परंतु शहरातील पालिकेकडे असलेला पहिला लशीचा डोस देण्यासाठी लसच शिल्लक नसल्याने देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून प्रथमच पूर्णत: लसीकरणाला नवी मुंबईत खंड पडला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पालिकेने मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत शहरातील १ लाख ४३ हजार ७२१ नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे, तर करोनायोद्धे तसेच ज्येष्ठ नागरिक यासह एकूण ४ लाख ५० हजार जणांना लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने समोर ठेवले आहे. नवी मुंबई महापालिकेकडे कोव्हॅक्सिनच्या १५ हजार लस कुप्या शिल्लक आहेत, परंतु ज्या नागरिकांना पहिली मात्रा कोव्हॅक्सिनची दिली आहे त्यांना याच कोव्हॅक्सिनची मात्रा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोससाठी उपयोग करता येत नाही. ज्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे त्यांना १२ एप्रिलपासून दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन लस राखून ठेवण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.