साठा न पोहोचल्याने मोहिमेत अडथळा

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वेगाने होत असलेले नवी मुंबईतील लसीकरण गुरुवारपासून मंदावले असून शुक्रवारी शहरातील लसीकरण मोहीम पूर्णपणे ठप्प होणार आहे. मागणीनुसार लशींचा साठा गुरुवारी सायंकाळपर्यंत न मिळाल्याने शहरातील ४९ केंद्रे बंद राहणार आहेत. गुरुवारीही शहरात केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण पार पडले.

ठाणे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेत नवी मुंबई आघाडीवर आहे. शहरात एकूण ४९ केंद्रांवर लसीकरण केले जात असून दिवसाला १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने आखले आहे. मात्र, लशींचा साठा वेळेत मिळत नसल्यामुळे या कार्यक्रमात अडथळे येत आहेत. शहरात बुधवारी मागणीनुसार लसच प्राप्त न झाल्याने नवी मुंबईतही लसतुटवडा जाणवू लागला. लसच न मिळाल्याने अनेक केंद्रे गुरुवारी बंद होती. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लशींद्वारे  लसीकरण करण्यात येत आहे. गुरुवारी शहरात फक्त जवळजवळ ३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले. शहरात लसतुटवड्यामुळे ४९ पैकी फक्त महापालिकेची नेरुळ, वाशी, ऐरोली येथील ३ रुग्णालये, तुर्भे येथील माता बाल रुग्णालय व वाशी कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो लसीकरण केंद्र येथेच लसीकरण करण्यात आले, परंतु गुरुवारी सायंकाळपर्यंत लसच प्राप्त न झाल्याने लसीकरणावर  मोठा परिणाम होणार  असून शुक्रवारी लशीअभावी शहरातील लसीकरण ठप्प होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने २,५०,००० कोविशिल्ड व ७५,००० कोवॅक्सिन लशींची मागणी केली आहे. परंतु आवश्यक तेवढा लससाठाच नसल्याने लसीकरण ठप्प होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व पालिका आयुक्त अभिजीत बांगर व लसीकरण प्रमुख यांच्या नियोजनामुळे नवी मुंबई महापालिका लसीकरणात ठाणे जिल्यात अव्वल आहे, परंतु शासनाकडून लस प्राप्त झाली नाही तर लसीकरणाला खंड पडणार आहे. पालिकाक्षेत्रात वैद्यकीय करोनायोद्धे तसेच पहिल्या फळीतील करोना योद्धे यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून  नवी मुंबई महापालिका ही ठाणे जिल्यात लसीकरणात अव्वल आहे, परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत लस प्राप्त झाली नव्हती. लस न मिळाल्यास शुक्रवारी शहरातील लसीकरणाची सर्व केंद्रे बंद राहतील.

-डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका