लससाठा उपलब्ध होण्याबाबत अनिश्चितता;  ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर ताटकळ

पनवेल : पंतप्रधानांनी लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर १२ ते १४ एप्रिलदरम्यान अवघे पाच हजार नवे लसीकरण पनवेल पालिका करू शकली. त्यानंतर उत्सवही संपला आणि लसीही संपल्या अशी स्थिती पनवेल पालिकेची झाली आहे. लस पनवेल पालिकेला कधी व किती मिळणार याची नेमकी तारीख आरोग्य विभागाला सांगता येत नसल्याने पालिकेच्या केंद्रातून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या रोज केंद्रांवर हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.

खारघर येथील अयप्पा मंदिराशेजारील लसीकरण केंद्रात शुक्रवार सकाळपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी पालिकेच्या केंद्रामध्ये नोंद केली आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रातून संबंधित लस लाभार्थीना नंबरचे टोकन देण्यात आले आहे. परंतु या केंद्रात आल्यावर लस उपलब्ध नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळते. अनेक ज्येष्ठ नागरिक तीन आसनी रिक्षांचा प्रवासखर्च करून तर अनेक नागरिक चालत आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येतात. मात्र येथे आल्यावर त्यांना लस नेमकी कधी मिळणार याचे उत्तर मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शेखर सावंत यांनी पनवेल पालिकेने टोकन दिलेल्या नागरिकांशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना लस कधी व कोणत्या वेळेत मिळणार याची माहिती दिल्यास नागरिक व पालिकेमध्ये सुसंवाद साधला जाईल, असा पर्याय सुचविला आहे.

पनवेल ग्रामीण भागातही वावंजे आरोग्य केंद्रवगळता इतर कुठेही लसीकरण शुक्रवारी सुरू नव्हते. ग्रामीण भागातही लशी संपल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून लशी आल्यानंतर लसीकरणाचा पुढील कार्यक्रम सुरूहोईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी तयार नसल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.

७० हजार ४८९ जणांना लस

पनवेल पालिकेला ११ तारखेला कोविशिल्डच्या पाच हजार लशी मिळाल्यानंतर पालिकेने ६ हजार ४७९ नागरिकांना लस दिली. त्यानंतर पुन्हा जिल्हा पातळीवरून लस उपलब्ध झाल्या नाहीत. आतापर्यंत पालिकेने ७० हजार ४८९ जणांना लस दिली.