नवी मुंबई : शहरी भागातील नागरिकांकडे लसीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याने दुर्लक्ष झालेल्या झोपडपट्टी भागात पालिका येत्या काळात मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबविणार आहे. करोनाचे नियम पाळणाऱ्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागापेक्षा हा झोपडपट्टी भाग आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. तिसरी लाट या झोपडपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आता नवी मुंबईतील ४१ झोपडपट्टी वसाहतीतील दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांकडे लसीकरणासाठी लक्ष देणार आहे.

नवी मुंबईत प्लोटिंग लोकसंख्येसह या शहरात पंधरा ते सोळा लाख लोकसंख्या झाली आहे. यातील दहा लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. नवी मुंबईतील जास्तीत जास्त जनतेला लवकर लसीकरण व्हावे यासाठी पालिकेने जागतिक निविदा देखील मागवली आहे पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसीच्या डोसवर पालिकेचे लसीकरण अवलंबून आहे. नवी मुंबई ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी अशा तीनही वसाहतीचे शहर आहे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसीचे जास्तीत जास्त लाभ हा शहरी भागातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे यानंतर पालिका लसीकरण करण्यासाठी मोहीम राबविणार आहे.