महापालिकेचे नियोजन; एक लाख नवी मुंबईकरांना पहिली मात्रा

नवी मुंबई : शहरात १६ जानेवारीपासून करोना लसीकरण सुरू झाले असून २ फेब्रुवारीपर्यंत एक लाख नवी मुंबईकरांना लशीची पहिली मात्रा  देण्यात आली आहे. १९ हजार ९१२ जणांना दुसरी मात्राही देण्यात आली आहे. आता दिवसाला ५ हजार जणांना लस देण्यात येत आहे. यात वाढ करण्यात येणार असून ही संख्या दहा हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

शहरात करोनाशी प्रशासन सध्या अनेक पातळीवर लढा देत आहे. एकीकडे रुग्णवाढीमुळे आरोग्यव्यवस्थेवर भर दिला जात असताना जास्तीत जास्त नागरिकांना करोना लस देण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांचे मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागले. आता दोन दिवसांपासून तिसरा टप्पाही सुरू झाला असून सध्या शहरात पालिका व खासगी रुग्णालयात मिळून ४२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन रुग्णालयांत दिवसरात्र लसीकरण सेवा दिली जात आहे. तर तुर्भे माताबाल रुग्णालय व १९ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केले जात आहे. याशिवाय सेक्टर ५ वाशी येथील ईएसआयएस रुग्णालयामध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरू केले असून ते सकाळी ८ ते रात्री ८ अशा दोन पाळ्यांमध्ये ४ बूथवर लस दिली जात आहे. पालिकेच्या २६ केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. याशिवाय १६  खासगी रुग्णालयांमध्येही शासनमान्य २५० रुपये प्रतिमात्रा दराने लसीकरण केले जात आहे. ३१ मार्चपर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ९३ हजार ३६९ जणांना लशीची मात्रा देण्यात आली होती. तर १ एप्रिलपासून तिसरा टप्पा सुरू झाला असून पहिल्या दिवशी ३,३२६ जणांना लस देण्यात आली होती. शुक्रवारपर्यंत शहरातील १ लाख ५ हजार ८९७ जणांना लशींची महिली मात्रा तर १९ हजार ९१२ जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.  दोन दिवसांपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून आता जास्तीत जास्त नवी मुंबईकरांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहरातील चार लाख ५० हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सध्या दिवसाला ५ हजार जणांना लस देण्यात येत आहे. मात्र यापुढे आता ही संख्या दहा हजारांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोठ्या सोसायट्यांतील नागरिकांना एकत्र लस

नवी मुंबईत मोठी गृहसंकुले व सोसायट्या मोठया प्रमाणात आहेत. यासाठी पालिका प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मोठ्या सोसायट्या किंवा गृहसंकुलांतील नागरिकांना आता एकाच वेळी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणास पात्र असलेल्या सोसायटीतील सर्व नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर संपर्क करून लसीकरणाची वेळ घ्यावी व मिळालेल्या वेळी एकत्र येत लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही पालिका आयुक्तांनी केले आहे.