महापालिका केंद्रांवर दिवसाला सरासरी एक हजार जणांचे लसीकरण; १५ हजार जणांना लस देण्याची सुविधा

संतोष जाधव

नवी मुंबई : लसीकरणासाठी पहाटेपासून रांगा लागत असल्याचे शहरातील चित्र आता बदलले आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस आहे पण नागरिक नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हा बदल दिसत असल्याने पालिका प्रशासनाने लसीकरण हीच करोनापासूनची खरी सुरक्षा असून लस घ्या असे आवाहन केले आहे. दिवसाला १५ हजार जणांना लस देण्याचे पालिकेने नियोजन केले असताना आता दिवसाला हजार ते बाराशे जणच लस घेत आहेत.

पालिकेने लसीकरणाची व्यापकता वाढवण्यासाठी मागील दोन दिवसांपासून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. एका दिवसात १५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे असताना काही दिवसांपासून १ ते दीड हजारांपर्यंतच लसीकरण होत आहे.

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत ४,४३,४५१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या १५ लाखांची असल्याने अद्याप २५ टक्केही लसीकरण झाले नाही. याला दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून लस उपलब्ध होत नव्हती, हे मुख्य कारण आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापेक्षा अधिक झाल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांनी प्राधान्य दिल्याने लसीकरण केंद्रांवर रांगा लागत होत्या. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना परत जावे लागत होते.

परंतु मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची दैनंदिन संख्याही रोडावली असून ती ५० पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयातही लसीकरणासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे  दिसून येत आहे. मात्र खाजगी सोसायटय़ा व तसेच कंपन्या खासगी रुग्णालयांकडून समूह लसीकरणासाठी सरसावल्याचे चित्र होते. त्यामुळे पालिकेच्या केंद्रांवर दिवसाला हजार ते बाराशे जणांचे लसीकरण होत असले तरी एकूण त्या दिवसाची लसीकरणाची संख्या ही दहा हजारांच्या घरात आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी ४५ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु त्यात नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. नागरिकांनी करोना लस घेणे महत्त्वाचे असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रांत वाढ

नवी मुंबई महापालिकेची व खासगी रुग्णालयांची मिळून एकूण १११ लसीकरण केंद्रे होती. त्यात आता पालिकेने विविध शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. पुढील काही दिवसात आणखी ५४ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरात लसीकरणासाठी पालिका मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करत आहे, परंतू काही दिवसांपासून पालिका व खासगी रुग्णालयांमार्फत होणाऱ्या लसीकरणाची संख्या रोडावली असल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांनी स्वत:च्या कुटुंबाच्या रक्षणासाठी लस घेणे आवश्यक आहे. आठवडाभरात पालिका आणखी ५४ लसीकरण केंद्रे सुरू करत आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका