उरण तालुक्यात मातीच्या भरावासाठी होत असलेली बेसुमार जंगलतोड आणि डोंगरांची पोखरण सुरू असल्याने या जंगल आणि डोंगरात स्थान असलेले विविध जातींचे साप, सरपटणारे प्राणी तसेच पक्ष्यांनी सध्या नागरी वस्तीची वाट धरली आहे. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी वातानुकूलित जागा, स्नानगृह, प्रसाधनगृह, सांडपाण्याच्या जागा तसेच पाण्याच्या नळाचा आसरा घेऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जात अशा सापांची माहिती निसर्ग संवर्धन संस्थेला देऊन सापांना वाचविण्याचे आवाहन या संघटनेने केले आहे.
उरणचा पूर्व विभाग डोंगरातील भाग असून येथे मोठय़ा प्रमाणात जंगल आणि वृक्षही आहेत. त्यामुळे जंगलातील पक्षी-प्राणी त्याचप्रमाणे विविध जातींचे विषारी, बिनविषारी सापांचीही संख्या मोठी आहे. चिरनेर, पुनाडे, वशेणी, कळंबुसरे, विंधणे, रानसई, आवरे, पाले, सारडे, पिरकोन परिसरांतील डोंगर तसेच शेतातील मातीचे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षी आणि प्राण्यांचे मुख्य स्थान असलेली ठिकाणे नष्ट होऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे जंगलातील पाणीसाठेही कोरडे पडल्याने तापमानापासून बचाव करण्यासाठी या प्राण्यांनी, येथील गावातील घरांमध्ये नाग, धामण, जोगी, अजगर जातींचे साप आढळू लागले आहेत. या संदर्भात निसर्ग संवर्धन संस्थेने सापांना न मारता ते पकडून वाचविण्यासाठी सर्पमित्रांना तातडीने बोलावण्याचे आवाहन केले आहे.