वाशीतील  सिडकोच्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे आंदोलन

सिडको निर्मित धोकादायक इमारतींना राज्य सरकारने वाढीव एफएसआय मंजूर करून एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही केवळ पालिकेच्या नियोजन विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे पुन्हा छत कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.  त्यामुळे वाशी येथील जेनवन जेनटू प्रकारातील इमारतीच्या महिला रहिवासी रविवारी शहरात पालिकेच्या नावाने थाळीनाद करणार आहेत. या भागातील आठ गृहनिर्माण संस्थांनी पुनर्बाधणीचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतरही त्यांना परवानगी देण्यास चालढकलपणा केली जात असल्याने येथील रहिवाशी संतप्त आहेत.

सिडकोने मागील ४० वर्षांत बांधलेल्या काही इमारतींचे निकृष्ट बांधकाम रहिवाशांच्या जिवावर उठले आहे. त्यामुळे ऐरोली ते बेलापूर येथील हजारो रहिवाशी सिडको निर्मित इमारतींची पुनर्बाधणी करण्याची मागणी करीत आहेत. त्यासाठी गेली वीस वर्षे अनेक आंदोलन व न्यायालयीन लढाई या रहिवाशांना लढावी लागली आहे. आघाडी सरकारने या रहिवाशांच्या पुनर्बाधणीसाठी अडीच वाढीव एफएसआयचा निर्णय घेतला होता, पण तो विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेत नंतर अडकला. त्यामुळे भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत या रहिवाशांना वाढीव एफएसआय देऊन दिलासा दिला. वाढीव एफएसआयमुळे पुनर्बाधणी झालेल्या इमारतीतील नवीन घरांचे स्वप्न रहिवाशी उराशी बाळगत असतानाच पालिकेच्या नाकर्तेपणामुळे गेल्या सव्वा वर्षांत वाढीव एफएसआयचा एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. पालिकेच्या नियोजन विभागात कार्यरत असलेले काही अधिकारी हे पुनर्बाधणी करीत असलेल्या विकासकांकडून अपेक्षित ‘लक्ष्मी’दर्शनासाठी हे प्रस्ताव जाणूनबुजून प्रलंबित ठेवत असल्याची टीका आता रहिवाशी करू लागले आहेत.

गेल्या वर्षभरात या अधिकाऱ्यांनी अनेक विकासकांचे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर केले पण शहरातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अधिकाऱ्यांच्या या स्वार्थी हेतूमुळे या वर्षीचा पावसाळाही रहिवाशांना ओलसर भिंती, त्यामुळे त्याला लागणारे विजेचे धक्के आणि पडणारे छत या भीतीखाली काढावे लागणार आहे. त्यामुळे येथील आठ गृहनिर्माण सोसायटींतील शेकडो महिलांनी रविवारी अग्निशमन दलापासून संपूर्ण वाशीत थाळीनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी सेक्टर नऊ-दहामध्ये थाळी वाजवत आंदोलन करणारे हे रहिवाशी या अन्यायाकडे सर्वाचे लक्ष वेधणार आहेत. महिलांच्या या थाळीनाद आंदोलनाला पुरुष रहिवाशी काळी चड्डी-बनियान घालून पालिकेच्या नियोजन विभागाचा निषेध व्यक्त करणार आहेत. एफएसआयच्या या विषयावरून अशा प्रकारचे आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतही पालिका बांधकाम परवानगी देण्यास इतका वेळ लावत आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. यात रहिवाशांना वेठीस धरले जात असल्याचे अधिकारी विसरत आहेत.      किशोर पाटकर, नगरसेवक, वाशी सेक्टर नऊ