सुसाट वाहनांमुळे किरकोळ अपघात

गेले २३ दिवस दुरुस्तीसाठी बंद असलेली वाशी खाडीपुलावरील मुंबईकडे जाणारी मार्गिका अखेर बुधवारी रात्री उशिरा वाहतुकीस खुली करण्यात आली, मात्र त्यानंतर एका वेगळ्याच डोकेदुखीने वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या सुसाट प्रवासामुळे किरकोळ अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेले २३ दिवस पर्यायी व्यवस्थेत शिस्तीत वाहने चालविणारे पुलावरील प्रवास सुरळीत झाल्यानंतर वेगाने वाहने चालवू लागले आहेत.

ठाणे खाडीवर मुंबई, नवी मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या पुलाची उभारणी सत्तरच्या दशकात करण्यात आली. त्यानंतर २० वर्षांत हा पूल वाहतुकीस अपुरा पडू लागल्याने सरकारने नव्वदच्या दशकात दुसरा पूल बांधला. या पुलावरील वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेमधील दोन तुळयांमधील सांधे खिळखिळे झाले होते. त्यामुळे ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. प्रवास करताना वाहनचालकांना या सांध्यांचे जोरदार धक्का बसत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील महिन्यात या मार्गिकेची दुरुस्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २१ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.

३ फेब्रुवारीला या कामाला सुरुवात झाली. चेन्नई येथून आलेल्या निष्णात कामगारांनी हे काम वेळेत पूर्ण केले. त्यामुळे आता ही मार्गिका दुरुस्त झाली असून ते सांधे जोडले गेल्याने वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. गुरुवारी सकाळी दोन वाहनांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर वाहने बाजूला घेऊन पंचनाम्याची वाट पाहण्याचे सौजन्य वाहनचालक दाखवीत नसल्याचा अनुभव येऊ लागला आहे.

गेले २१ दिवस या पुलाच्या मार्गिकेची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे शहरात अथवा पुलावर वाहतूक कोंडी झाली नाही. वाहनचालकही चांगले सहकार्य करीत होते, मात्र काल पुलाची मार्गिका सुरू झाल्यापासून किरकोळ अपघातांची संख्या वाढू लागली आहे. पोलीस येईपर्यंत वाट पाहणारे वाहनचालक वाहतूक कोंडीस कारण ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार केला जाणार आहे. – सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक), वाशी