News Flash

वाशीत गर्दुल्ल्यांचा धुडगूस

नवी मुंबईतील पालिका उद्याने, खाडीकिनारे आणि निर्जन रस्त्यांवर अमली पदार्थ विकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

हाणामारीत दोघे जण जखमी; पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबईतील पालिका उद्याने, खाडीकिनारे आणि निर्जन रस्त्यांवर अमली पदार्थ विकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. वाशीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात रात्री हे अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची एका टोळीत हाणामारी झाल्याने दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही पालिका आणि खासगी शाळांच्या बाहेरही ही विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.

नवी मुंबईत शाळा, महाविद्यालयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या शहरात काही काळासाठी (प्लोटिंग पॉप्युलेशन) राहण्यास येणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या आसपास आहे. यात ग्रामीण भागात भाडय़ाने वा घर विकत घेऊन राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे. हे नागरिक अमली पदार्थाचे सेवन आणि विक्री मोठय़ा प्रमाणात करीत असल्याचे अनेकदा पोलिसांना आढळून आले आहे, मात्र पोलिसांच्या कारवाईला दाद न देणारे हे नागरिक सातत्याने ग्रामीण रहिवासी, महाविद्यालयीन तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थाची विक्री करीत आहेत. यात एमडी आणि ‘म्याव म्याव’ या दोन अमली पदार्थाची सर्रास विक्री केली जाते.

म्याव म्यावसाठी शालेय विद्यार्थ्यांना लक्ष केले जात आहे. या अमली पदार्थाचा गंध पालकांनाही येत नसल्याने शालेय विद्यार्थी या अमली पदार्थाच्या अधीन जाऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांना शहरात अमली पदार्थ विकणाऱ्यांची चांगलीच नाकाबंदी केली होती. त्यामुळे हे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता या टोळींनी पुन्हा उचल खाल्ली आहे.

नवी मुंबईत अनेक भागांत सिडको किंवा पालिकेने रस्ते, पदपथ, उद्याने विकसित केले आहेत. संध्याकाळी सहा-सातनंतर हा भाग शक्यतो निर्जन असल्याचे दिसून येते. त्याचा फायदा ही अमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या टोळ्या उचलत आहेत. ऐरोली येथील पामबीच विस्तार मार्ग, घणसोली, कोपरखैरणे, वाशी खाडीकिनारे, रात्री दहानंतर बंद होणारी उद्याने, मैदाने ही या अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची आश्रयस्थाने झाली आहेत.

वाशी सेक्टर-१० मधील जनरल अरुणकुमार वैद्य हे एक शहरातील मोठे उद्यान आहे. या ठिकाणी दुपारी दोन ते रात्री दहाच्या सुमारास पालिकेने सुरक्षा रक्षक नेमला आहे. रात्री हे उद्यान बंद केले जाते. बंद होणाऱ्या या उद्यानाचा फायदा परिसरातील अमली पदार्थ सेवन करणारे तरुण उचलत आहेत. त्या संदर्भात येथील नागरिकांनी वाशी पोलिस ठाणे आणि नियंत्रण केंद्राला अनेक वेळा तक्रारी केल्या.

पोलीस तक्रार लिहून घेतल्यानंतर मात्र कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा त्रास आता येथील रहिवाशांना कायमचा झाला आहे. येथील रहिवाशांनी पोलिसांना केलेल्या मोबाइलवरून केलेल्या तक्रारींचे ध्वनिमुद्रित पुरावे म्हणून ठेवले आहेत. ते लवकरच पोलिस आयुक्तांना या तक्रारी सादर केल्या जाणार आहेत. दहा ते १२ जणांच्या या टोळक्यामध्ये अमली पर्दार्थाच्या नशेत हाणामारी होऊन त्यातील दोन जण रुग्णलयात दाखल आहेत. वाशीतील ‘सी-शोअर’चा भाग हा रात्रीच्या वेळी एकांतचा आहे. त्या ठिकाणी या अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची दहशत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिक संध्याकाळनंतर या भागात जाण्याची हिंमत करीत नाहीत. गर्दुल्ल्याकडे धारदार शस्त्र असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रार किंवा जाब विचारण्यास रहिवासी पुढे धजावत नाहीत.

नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी अमली पदार्थ सेवन आणि विक्रीचे प्रमाण वाढल्याने शाळा संचालकांची चिंता वाढली आहे. वाशी सेक्टर दहा अ मधील साईनाथ इंग्लिश हायस्कूल आणि  सेंट मेरी मल्टीपर्पज हायस्कूल या दोन शाळांना थेट पोलिस आयुक्त संजय कुमार यांना पत्र पाठवून येथील अमली पदार्थाचा फेरा सांगितला आहे. अशा प्रकारे शाळांना या तक्रारीत पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात येथील स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर दिवाळीनंतर व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मद्यपींचाही त्रास

अमली पदार्थ सेवन करून नशेत गुंग असणाऱ्या या टोळ्यांबरोबर खुलेआम मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे सकाळी साफसफाई करणाऱ्या पालिकेच्या कामगारांना उद्याने, मोकळ्या जागा, निर्जन रस्ते, खाडीकिनाऱ्यांवर सर्वाधिक दारूच्या बाटल्या आढळून येतात. यात ह्य़ा बाटल्या फोडून काचांचा चक्काचूर करणारे महाभाग अधिक आहेत. दारूच्या बाटल्यांत बिअरच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:07 am

Web Title: vashi fight drugs akp 94
Next Stories
1 पावसामुळे फुलाच्या उत्पादनावर पाणी
2 नवी मुंबईवर कमळकांती!
3 राष्ट्रवादी, मनसेच्या अस्तित्वाची चुणूक
Just Now!
X