20 October 2019

News Flash

पालिकेच्या रुग्णसेवेचा बोजवारा

इंगळेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्त रामस्वामी एन. यांनी दोन डॉक्टरांना निलंबित केल्याचे पडसाद डॉक्टरांत उमटत आहेत.

डॉक्टरांच्या असहकारामुळे वाशी रुग्णालय ओस पडले आहे.

शेखर हंप्रस

वाशी रुग्णालयातील डॉक्टरांनी असहकार पुकारल्याने तेरणा रुग्णालयातील डॉक्टरांची मदत

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली असून तेरणा रुग्णालयातील डॉक्टरांच्या साहाय्याने आरोग्य सेवेचा गाडा हाकण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. दोन डॉक्टरांच्या निलंबनाच्या समर्थनार्थ अन्य दोन डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने आणि अन्य डॉक्टरांनी अघोषित असहकार पुकारल्याने परिस्थिती उद्भवली आहे. आम्ही योग्य ते निर्देश दिल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी सत्ताधारी आरोग्य सेवेपेक्षा प्रचारकार्यात जास्त व्यग्र असल्याची टीका विरोधीपक्ष करत आहे.

इंगळेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्त रामस्वामी एन. यांनी दोन डॉक्टरांना निलंबित केल्याचे पडसाद डॉक्टरांत उमटत आहेत. या सर्व प्रकरणात सामान्य रुग्ण मात्र भरडला जात आहे. वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाची आरोग्य सेवा पूर्णपणे ढेपाळली ट्रामा केअर विभागात नवीन रुग्णांना दाखल करून घेणे बंद करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागाला कुलूप लागले आहे. दोन डॉक्टरांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ अन्य दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत, तर ७ मेडिसिन डॉक्टरांनी असहकार पुकारला आहे. प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आजारी असल्याने रजेवर आहेत. परिणामी या रुग्णालयाची ओपीडी क्षमता १५०० ऐवजी ८००  ते ९०० पर्यंत आली आहे. सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर रुग्णालय सुरू आहे. जे गंभीर रुग्ण उपचार घेत होते अशा रुग्णांना अन्यत्र हलवण्यात येत आहे. शीव रुग्णालयाचा रस्ता अनेकांनी धरला आहे

या पूर्ण प्रकरणाविषयी अधिकृत माहिती देण्यास कुणीही उत्सुक नाही. हे प्रकरण अधिक चिघळण्याची भीती कामगार वर्गात व्यक्त होत आहे. चतुर्थश्रेणी कामगार व ऐरोली नेरुळ सीबीडी येथील रुग्णालयातील कर्मचारीही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. प्रकरण एवढय़ा गंभीर वळणावर असूनही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याची खंत अनेक कामगारांनी व्यक्त केली आहे.

रुग्णालयांच्या स्थितीकडे अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे हे फलित आहे. इंगळे यांनी हे प्रकरण लावून धरले अन्यथा अनेकांचे जीव गेले असणार, मात्र प्रत्येकजण लढा देऊ  शकत नाहीत. आजही एवढी गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी प्रचारात गुंग आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली.

या बाबत अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाली असून लवकरच जाहिरात देऊन डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. तात्पुरते तेरणा रुग्णालयाचे सहकार्य घेत आहोत.

– जयवंत सुतार, महापौर

दोन डॉक्टरांचे निलंबन व दोन डॉक्टरांनी राजनामे दिल्याने तारांबळ उडाली असली तरी सेवा सोमवार आणि मंगळवारी तेरणा रुग्णालयाचे डॉक्टर काम पाहणार होते. तेरणाचे १ व ऐरोली पालिका रुग्णालयातील १ डॉक्टर असणार आहेत.

– डॉ. दयानंद कटके, मुख्य वैद्यकीय अधिकारी

माझ्या आजीला येथे आणले होते मात्र शीव रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विनवणी केली असता अतिदक्षता विभागच बंद असल्याचे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेसाठीही पैसे नसल्याने संकट ओढावले आहे.

आरती कांबळे, रुग्णाच्या नातावेईक

First Published on April 25, 2019 2:31 am

Web Title: vashi hospital doctor non cooperation