28 February 2021

News Flash

वाशी ते कोपरी उड्डाणपूल दोन वर्षांत

२६८ कोटींचा खर्च; निविदा जाहीर

२६८ कोटींचा खर्च; निविदा जाहीर

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर बेलापूरपासून वाशीपर्यंत विनाअडथळा प्रवासाला वाशी ते कोपरीदरम्यान ‘ब्रेक’ लागत असल्याने महापालिका प्रशासनाने सिडकोच्या मदतीने या ठिकाणी तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचे ठरविले आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यासाठी २६८ कोटींचा खर्च अपेक्षित असून सिडको व पालिका हा खर्च करणार असून दोन वर्षांत हा पूल उभा राहणार आहे.

नवी मुंबईत पाम बीच मार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक विभागली जात असल्याने इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत वाहतूक समस्या तेवढी जाणवत नाही. बेलापूरपासून वाशीपर्यंतचा प्रवास हा विनाअडथळा सुरू असतो. मात्र वाशीतील महात्मा फुले चौकापासून कोपरी उड्डाणपुलापर्यंत या सुरळीत वाहतुकीला ब्रेक लागत असतो. अनेकदा वाहतूक कोंडीही होत असते.

यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या ठिकाणी उड्डाणपूल निर्मितीच्या कामाचा समावेश करण्यात आला होता. परंतु करोना संकटामुळे शहरातील अनेक मोठे प्रकल्प रखडले, त्यात या कामाचाही समावेश होता.  त्यामुळे पालिका आयुक्तांनी या कामासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पातही समावेश करीत निधीची तरतूद करण्याचे ठरविले असून त्यासाठीची निविदाही काढली आहे.

वाशीपासून कोपरीपर्यंत तीन किलोमीटरच्या अंतरात सहा सिग्नल असून सतरा प्लाझा परिसरात कायमची वाहतूक कोंडी असते. त्यामुळे सुमारे २.८५ किलोमीटरचा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. यामुळे या विभागातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार आहे. या कामासाठी २६८ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो सिडको व पालिका प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे. त्यामुळे महापे एमआयडीसीसह ठाणे-बेलापूर रस्त्याने पुढे जाणाऱ्या प्रवाशांना विनाअडथळा जाता येणार आहे.

या कामामध्ये दोषनिवारण कालावधी हा प्रथमच २० वर्षे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शीव-पनवेल महामार्गावरून पाम बीच मार्गावर येण्यासाठी नाल्यावर ज्या पद्धतीने पूल बांधण्यात आला आहे, तशी व्यवस्था ठाणेमार्गे या उड्डाणपुलावरून वाशीकडे येणाऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. यासाठी  ७ कोटींचा खर्च करण्यात येणार असून या दोन्ही कामांसाठीची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली .नवी मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून आचारसंहितेपूर्वीच या पुलाचा उद्घाटन कार्यक्रम घेतला जाण्याची शक्यता आहे.

असा असेल पूल

* उड्डाणपुलाचा खर्च : २६८ कोटी

* खर्चाची विभागणी : पालिका व सिडको ५० टक्के

* निर्मिती कालावधी : २ वर्षे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:25 am

Web Title: vashi to kopari flyover in two years zws 70
Next Stories
1 बेलापूर मध्ये पुन्हा मगरीचे दर्शन
2 स्वयंशिस्त पाळा, अपघात टाळा!
3 इमारत उंची मर्यादा वाढवल्याने ‘खारघर हिल प्ल्यॅटय़ू’ला संजीवनी
Just Now!
X