एपीएमसीत शुकशुकाट; कर्नाटक, गुजरातेतील मालाला उठाव नाही
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये बाजार समितीमुळे येणारा व्यापारी हा घटकच वजा करण्यासाठी राज्य सरकारने बाजार समिती नियंत्रणमुक्त व्यापार जाहीर केल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ, भाजी, व कांदा बटाटा बाजारात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पनवेल बाजार समितीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाठवलेली भाजी उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ आली.
गुजरात-दिल्लीप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बाजार समिती नियंत्रण मुक्त व्यापाराची मुभा देण्यात यावी अशी मागणी घेऊन राज्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये मंगळवारपासून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला शेतमाल पुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसी बाजारातील फळ व भाजी व्यापारीदेखील सामील झाले आहेत. त्यापूर्वी सोमवारी कांदा बटाटा, लसूण घाऊक बाजारपेठ या बंदमध्ये सहभागी झालेली आहे.
मुंबईला दररोज शेकडो टन भाजी पुरवठा करणाऱ्या एपीएमसीत सध्या कर्नाटकमधून टोमॅटो, कोबी, सिमला तर गुजरातमधून भेंडी, गवार, शेवग्याच्या शेंगा, दिल्लीहून टोमॅटो, सिमला येत होता. हा सर्व शेतमाल दोन ते तीन दिवस एपीएमसीत येण्यासाठी कालावधी लागतो. यात काही भाजीला उठाव न आल्याने व्यापाऱ्यांना ही भाजी सकाळनंतर फेकून द्यावी लागली. पनवेल बाजारात तर गिऱ्हाईक न फिरकल्याने शेकडो टन भाजी उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील व्यापारी संपावर जात असल्याचे समजल्यानंतर परराज्यातील व्यापाऱ्यांनी शेतमाल पाठविणे थांबविले आहे. तरीही तुरळक भाजी फळ बुधवार, गुरुवारी येण्याची शक्यता वर्तवली जात असून बुधवारी या बंदवर तोडगा न निघाल्यास ती भाजी व फळे फेकून देण्याची वेळ येणार आहे.
तुर्भे येथील घाऊक बाजारात आलेली भाजी मंगळवारी पहाटे व्यापाऱ्यांनी उतरवून घेतली आणि वितरित केली. त्यामुळे मुंबईत काही प्रमाणात भाजी पोहचली आहे, पण उद्या भाजीची एक जुडीदेखील मुंबईत नवी मुंबईतून पोहचणार नाही. त्यावेळी भाज्यांचे दर खऱ्या अर्थाने गगनाला भिडणार आहेत. येथील तीनही बाजारपेठा आता बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत.व्यापाऱ्याला शेतकरी पट्टी (कमिशन) कापून देत नाही तर गिऱ्हाईक पट्टीला हात लावण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आता व्यापार करायचा कशाला असे म्हणत पनवेल बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी हात वर केले असून उठाव न मिळाल्याने भाजी फेकण्याची वेळ आली.

* एपीएमसीच्या भाजी बाजारात कर्नाटक, गुजरात, दिल्ली येथून आलेली भाजी उतरवून घेण्यात आल्याने तिला पहाटे उठाव मिळाला, पण सूर्योदयानंतर बाजारात शुकशुकाट पसरला होता.
* शेतकऱ्यांना शेतमाल थेट किरकोळ बाजारात आणून विकण्याची मुभा देण्यासाठी सरकारने बाजार समिती नियंत्रण मुक्त व्यापार केला आहे. त्यामुळे राज्यात असलेल्या सुमारे ३०० बाजार समितीतील व्यापाऱ्यांची गरज संपुष्टात आली आहे.
* शेतकऱ्यांना बाजार समितीत शेतमाल विक्री न करता बाहेर कुठेही विक्रीची मुभा देणाऱ्या या कायद्यामुळे राज्यातील व्यापारी अडचणीत सापडले आहेत.

सोमवारी फळ व भाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे भाजी बाजारात आज पहाटे ४५० ट्रक भरून आलेली भाजी व्यापाऱ्यांनी उतरवून घेतली आणि तिचे वितरण केली.
-शंकर पिंगळे, भाजी बाजार माजी संचालक