आवक वाढली; कोबी, फ्लॉवर दहा रुपये किलो

नवी मुंबई : थंडीचे पोषक वातावरण, वाढलेली आवक, शेजारच्या राज्यांची शेतमाल पाठविण्याची चढाओढ यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर गडगडले आहेत. गृहिणींची सर्वाधिक पसंती असलेली कोबी व फ्लॉवर या दोन भाज्या तर दहा रुपये किलोच्या दरात मिळत आहेत. हे घरसलेले दर मार्च महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

मागील महिन्यात भाज्यांची आवक कमी होत असल्याने भाज्यांचे दर वधारले होते. मात्र गेले पंधरा दिवस सुरू झालेला थंडीचा मोसम आणि ऑक्टोबरमध्ये लावलेल्या भाज्यांना आलेला पिक यामुळे मुंबई, पुणे येथील घाऊक बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुर्भे येथील भाजी बाजारात मंगळवारी ६०५ ट्रक टेम्पो भरून भाज्यांची आवक झाली. गेले तीन-चार महिने ही आवक केवळ पाचशे गाडय़ांची होती. आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरले आहेत.

करोनाच्या भीतीमुळे आजही सर्वसामान्य खरेदीदार बाहेर पडलेला नाही. त्यामुळे घाऊक बाजारात करोनापूर्वी जमणारी गर्दी आता कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांना उठावदेखील राहिलेला नाही. दर कमी होण्याचे हेही एक कारण सांगितले जात आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील आवक वाढलेली असताना शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक जिल्ह्य़ांतून गाजर, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा, वाटाणा या भाज्यांची आवक वाढली आहे. मुंबईत भाज्या पाठविण्यासाठी हे शेजारील राज्य नेहमीच आघाडीवर असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मिळणारा चांगला भाव हे त्यामागील कारण मानले जात आहे. थंडीचा मोसम जसा फळभाज्यांना पूरक आहे तसा तो वेलीच्या भाज्यांना घातक असल्याने वेलीवरील भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा अनेक कारणांमुळे भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले असून पुढील तीन महिने हे दर आवाक्यात राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे प्रतिकिलोचे दर

* फ्लॉवर : ९ रुपये

* कोबी : १० रुपये

* भेंडी : २० रुपये

* दुधी : १७ रुपये

* गाजर : २२ रुपये

* काकडी : ०७ रुपये

* वाटाणा : २० रुपये

* वांगी : १२ रुपये

* पडवळ : १५ रुपये

घाऊक बाजारात भाज्यांची आवक नेहमीपेक्षा वाढली आहे, मात्र खरेदीदार कमी आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर मागील महिन्यापेक्षा कमी झाले आहेत. हे दर मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात अवकाळी पाऊस झाला तर मात्र पुन्हा भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. शेजारच्या राज्यांतील भाज्यांचे दरदेखील कमी झाले आहेत.

– कैलाश तांजणे,अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ, तुर्भे