वाशी, कोपरखैरणे, नेरुळ परिसरात भाज्यांचे दर चौपट

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाज्यांच्या दरांत लक्षणीय घट झाली असली तरीही, किरकोळ बाजारात मात्र भाव चढेच आहेत. गेल्या महिन्यापासून किरकोळ बाजारातील ग्राहकांना घाऊक बाजाराच्या तुलनेत फ्लॉवरसाठी चौपट पैसे मोजावे लागत आहेत. वाशी, कोपरखैरणे, नेरुळ परिसर एपीएमसी बाजाराच्या जवळच असूनदेखील घाऊक बाजारात आठ ते १० रुपये किलो दराने उपलब्ध असणार फ्लॉवर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये दराने विकला जात आहे. पनवेलमध्ये त्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

सध्या वाशीच्या एपीएमसी बाजारात फ्लॉवर, काकडी, वांगी, दुधी या फळभाज्या अधिक प्रमाणात दाखल होत आहेत. घाऊक बाजारात या भाज्यांचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपये असले तरी याच भाज्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांना विकल्या जात आहेत. शहराच्या जवळपास सर्वच भागांत घाऊक  बाजारभावाच्या तुलनेत भाज्यांसाठी तिप्पट ते चौपट दर आकारले जात आहेत. एपीएमसी बाजारात दीड हजार क्विंटल काकडीची आवक होत आहे. घाऊक बाजारात काकडी प्रतिकिलो ४ ते ५ रुपये असून किरकोळमध्ये मात्र ४० रुपयांवर आहे. घाऊक बाजारात रोज हजार क्िंवटलहून अधिक वांगी येत असून तिथे आठ ते १० रुपये किलोला उपलब्ध असणारी वांगी किरकोळीत ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. दुधीही मोठय़ा प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. घाऊक बाजारात पाच ते सहा रुपयांना मिळणारा दुधी किरकोळ बाजारात ४० रुपये किलो आहे. एकंदरीत किरकोळ बाजारात घाऊक बाजाराच्या तुलनेत चौपट दर आकारून लूट सुरू आहे. विक्रेत्यांचे उखळ पांढरे होत असताना ग्राहकांचे मात्र कंबरडेच मोडले आहे.

महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात ४० ते ४५ रुपये किलो आणि किरकोळ बाजारात शंभरी पार करून १२० रुपयांवर पोहोचलेला फ्लॉवर आता गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात येऊ लागला आहे. बाजारात शुक्रवारी एकूण पाच हजार क्विंटल फ्लॉवरची आवक झाली. घाऊक बाजारात आठ ते १० रुपये किलो दराने विकला जाणार फ्लॉवर नवी मुंबईतील किरकोळ बाजारांत प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये तर पनवेलमध्ये प्रतिकिलो ६० रुपयांनी विकला जात आहे.

बाजारात जाऊन भाजी विकत घेणे, तिची वाहतूक करणे, दुकानाचे भाडे, वीज आणि अन्य खर्च निघतील एवढा अधिक भाव आकारावा लागतो, असे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.