दर १५ ते २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

राज्यात पडलेला समाधानकारक पाऊस आणि वाढलेले भाज्यांचे उत्पन्न यामुळे नवी मुंबईतील भाज्यांच्या घाऊक बाजारात मागील आठवडय़ात साडेचार हजार ट्रक, टेम्पो भरून भाज्या दाखल झाल्या. गेल्या दोन दिवसांत ही संख्या १७५० गाडय़ांवर पोहोचली आहे. गेल्या माहिन्यात वाढलेल्या भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. या भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र किरकोळ विक्रेते याचा गैरफायदा घेत भाज्या चढय़ाच दरांनी विकत आहेत.

गेल्या महिन्यात भाज्यांचे दर वाढले होते. वाटाणा तर ५० ते ६० रुपये किलोने विकला जात होता. तोच वाटणा आता अध्र्या किमतीवर आला असून घाऊक बाजारात ३० ते ३२ रुपये किलोने विकला जात आहे. ग्राहकांना हा फार मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यात पडणाऱ्या तुरळक पावसामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात भाज्यांचे चांगले उत्पादन झाले आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातील एक हजार ७५० गाडय़ा भरून भाज्या घाऊक बाजारात आल्यामुळे भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवडय़ातील ही संख्या एकूण साडेचार हजार गाडय़ांची होती. गेल्या कित्येक वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात आवक होण्याची ही पाहिलीच वेळ असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. यात चारशे ते साडेचारशे गाडय़ा कर्नाटक व गुजरात या शेजारी राज्यांतील असण्याची शक्यता आहे. मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने मागील महिन्यात वाढलेले भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यात कोबी व फ्लॉवर हे तर १०-१२ रुपये किलोच्या घरात आले आहेत.

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातून भाज्यांची आवक वाढली आहे. दर १५ ते २० टक्के कमी झाले आहेत. किरकोळ विक्रेते चढय़ाच दरांनी विक्री करत आहेत.

– शंकर पिंगळे, व्यापारी