नोटाबंदीमुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी हतबल

तुर्भे येथील भाजीच्या घाऊक बाजारात भाज्या खरेदी करण्यास आलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडे असलेल्या पाचशे व एक हजाराच्या नोटा घेण्यास घाऊक व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने शुक्रवारी घाऊक बाजारात जास्तीत जास्त २० टक्क्े भाज्या उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ घाऊक व्यापाऱ्यांवर आली. पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा घेतल्या होत्या; पण तीन दिवसानंतर पुन्हा त्या जुन्या नोटांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी शुक्रवारी त्यांनी नोटा घेण्यास नकार दिला.

गेले तीन दिवस नोटांची समस्या कायम आहे. शुक्रवारी शिल्लक भाज्यांचे प्रमाण वाढल्याने घाऊक व्यापाऱ्यांना २० टक्के भाज्या फेकून देण्याचे पाऊल उचलावे लागले. भाजीच्या घाऊक बाजारात सुमारे तीन ते चार हजार किरकोळ विक्रेते दररोज पहाटे तीन वाजता भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. भाज्या उकीरडय़ावर फेकून द्याव्या लागल्याने विकल्या गेलेल्या भाज्यांची भाव मोठय़ा प्रमाणात पडल्याचे चित्र होते. कोणतीही भाजी दहा ते बारा रुपये दरापर्यंत विकली गेली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे परिणाम अनेक क्षेत्रावर झाले आहेत. त्यात तुर्भे येथे असलेल्या पाच घाऊक बाजारातील भाजी बाजारावर हा परिणाम तीन दिवसानंतर मोठय़ा प्रमाणात जाणवू लागला आहे. बुधवार पासून बाजारात सरासरी पाचशे ट्रक व टेम्पो भरून भाज्या आल्या असून त्याला उठाव राहिलेला नाही. आज ना उद्या ही भाजी जाईल, या अपेक्षाने नाशिवंत नसलेल्या काही भाज्या घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी शिल्लक ठेवल्या होत्या, पण त्यांना आजही किरकोळ विक्रेत्यांनी केवळ पैसे नसल्याने हात न लावल्याने काही व्यापाऱ्यांना या भाज्या प्लास्टिकच्या मोठय़ा पिशवीत भरून उकिरडय़ावर फेकून द्याव्या लागत आहेत.

veg1

नवी मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा विभाग शनिवारी पहाटे या उकिरडय़ावर टाकण्यात आलेल्या  भाज्यांच्या पिशव्या उचलून नेणार आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने भाज्यांचे उत्पादन वाढू लागले आहे. अशावेळी गेली अनेक वर्षे निर्सगाने मारणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चलनाने मारल्याचे चित्र आहे.

घाऊक बाजारात पाठविण्यात आलेल्या भाज्यांना उठाव नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा परतावा मिळणार नाही. काही व्यापाऱ्यांनी दोन दिवस या भाज्या घेऊन ठेवल्या होत्या, त्यांनाही उठाव न आल्याने त्या सडून गेल्याने उकिरडय़ावर फेकून द्याव्या लागल्या असून त्याची पट्टी शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून द्यावी लागणार आहे.

पाचशे व हजार नोटा वापरण्यासाठी पेट्रोल पंप, रुग्णालय, तसेच शासकीय कार्यालयात जशी मुभा देण्यात आली तशी मुभा भाजी व फळ या घाऊक बाजारातही देण्याची आवश्यकता आहे. भाजी हा नाशिवंत शेतमाल असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडे असेल त्या चलनात हा माल विकणे आवश्यक आहे. आता अनेक व्यापाऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांना त्यांचा शेतमाल फेकून व उधार द्यावा लागला आहे. सरकारने या व्यापारासाठी किमान दहा दिवसाची मुदत देण्याची गरज होती.

 

शंकर पिंगळे, व्यापारी, भाजी घाऊक बाजारपेठ, एपीएमसी

किरकोळ बाजारात भाजी विक्रेत्यांची संख्या कमी झाली असून ज्या ठिकाणी चार पाच किरकोळ विक्रेते भाजी विकत होते तिथे आता एखादा आढळून येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाजी स्वस्त झाल्या असल्या तरी त्या किरकोळ बाजारात तिप्पट महाग झालेल्या आहेत. केंद्राने असा अचानक निर्णय घेतल्याने चलन बदलाचा असाही एक तोटा झाला आहे. त्यामुळे बाजारात चांगली भाजी येऊनही ती घरी आणून शिजवता येत नाही.  किरकोळ बाजारात भाज्या महाग आणि घाऊक बाजारात स्वस्त असे चित्र आहे.

ललिता गोसावी, गृहिणी, कोपरखैरणे