घाऊक बाजारात बहुतांश भाज्या २० रुपयांच्या घरात; किरकोळ बाजारात मात्र दुपटीने विक्री

गेल्या काही दिवसांपासून स्वस्ताईच्या वाटेवर असलेल्या घाऊक भाजीबाजारात भाज्यांच्या दरांत आणखी घसरण पाहायला मिळत आहे. चालू आठवडय़ात परराज्यातून होणाऱ्या आवकपेक्षा राज्यातून येणाऱ्या भाजीमालाची आवक वाढल्याने पालेभाज्यांसह बहुतांश भाज्यांचे दर घसरले आहे. घाऊक बाजारात बहुतांश भाज्या किलो वा जुडीमागे २० रुपये दराने विकल्या जात आहेत. मात्र, किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी ही स्वस्ताई ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी पूर्वीइतकेच दर ठेवल्याने ग्राहकांना घाऊक दराच्या दुप्पट-तिप्पट दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.

गुजरात, राजस्थान, आणि मध्य प्रदेश या शेजारच्या राज्यातून मुंबईच्या घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर खाली उतरत असतानाच पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातूनही दोन दिवसांपासून भाज्यांची प्रचंड आवक होत आहे. एकाच वेळी राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक ६५० ते ७०० ट्रकच्या घरात जाऊ लागली आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांसह कोबी, फ्लॉवर, काकडी, गाजर, टोमॅटो, वांगी अशा बहुतांश भाज्या स्वस्त झाल्या आहेत. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात बुधवारी बहुतांश भाज्या सरासरी १०ते २० रुपये किलो वा जुडी दराने विकल्या जात होत्या.

भाज्यांचे दर घसरल्यामुळे एकीकडे भाजीउत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची चिन्हे असताना घाऊक बाजारातील स्वस्ताई ग्राहकांपर्यंतही पोहोचताना दिसत नाही. मुंबई-ठाण्यातील बहुतांश किरकोळ बाजारात भाज्या पूर्वीइतक्याच दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे स्वस्ताईच्या या वातावरणाचा फायदा घेऊन किरकोळ विक्रेते नफेखोरी करत असल्याचे दिसत आहे.

घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने दर कमी झालेले आहेत. दहा ते बारा रुपयात सर्वपसंत भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत. हा मोसम पुढील एक महिना राहण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्रेत्यांनी याचा फायदा ग्राहकांना दिला पाहिजे. कमी दरामुळे ग्राहकांचा फायदा होणार असला तरी शेतकऱ्याचे यात नुकसान होत आहे.

शंकर पिंगळे, भाजी व्यापारी तथा माजी संचालक, एपीएमसी, तुर्भे