व्यवसायात बदल करीत परिस्थितीवर मात; करोनाकाळात संधी शोधणाऱ्यांच्या व्यथा

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : करोनाने हातचा रोजगार हिरावला. अनेकांचे चांगले चाललेले व्यवसाय ठप्प झाले. पण जगण्याची धडपड करणाऱ्यांना जसे न संपणारे दु:ख दिले, तसे बळही दिले. त्यामुळे मग फॅमिली बारच्या ठिकाणी भाजीचा ठेला आला तर फोटो स्टुडिओच्या जागी जंतुनाशक आणि मुखपट्टय़ा विकण्यास सुरुवात करण्यात आली. नवी मुंबईतील संधी शोधणाऱ्यांच्या या कथा प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत.

करोनामुळे इतर व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यापुढे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बदल करीत जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे.  जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक सोडले तर इतर व्यावसायिकांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे ते भाजी, दुग्धजन्य पदार्थ, मुखपट्टी, सॅनिटायझर आदी व्यवसायाकडे वळले आहेत.

कोपरखैरणेमध्ये एक फॅमिली बार आहे. मात्र तो बंद असल्याने सध्या या ठिकाणी गेलात तर बार बंद असून त्यासमोर भाजीचे दुकान सुरू झाले आहे. नेरुळमध्येही एक फोटो स्टुडिओ आहे. त्या ठिकाणी जंतुनाशक आणि मुखपट्टीची घाऊक विक्री सुरू केली आहे. करोनाने न संपणारे दु:ख दिले आहे, त्याच करोनाने बळही दिले, अशी भावना हे व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

२३ मार्चपासून बार बंद आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार, भाडे देणे शक्य होत नाही. निदान कामगारांचा पगार तरी निघावा म्हणून भाजी विक्री सुरू केली आहे. हा व्यवसाय कामगारच करीत आहेत. येईल तो नफा आपापसात वाटून घेत आहोत, अशी माहिती कोपरखरणे येथील बारमालकाने दिली.

सानपाडा येथे तुषार आचार्य यांचे पेट शॉप आहे. या ठिकाणी फिश टँक, पाळीव प्राण्यांची पिले विकली जात होती. मात्र आता हा व्यवसाय बंद करावा लागला आहे. व्यवसाय बंद असल्याने जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र न हरता आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या आप्पे या पदार्थाची विक्री सुरू केली आहे. लोकांना आवड निर्माण झाल्याने आता कुठे चार पैसे मिळू लागले आहेत, अशी भावना तुषार आचार्य यांनी व्यक्त केली.

रविकांत लाडके यांचा सानपाडा सेक्टर ४ येथे फोटो स्टुडिओ होता. उन्हाळ्यातच करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लग्न सराईचा व्यवसाय गेला. ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले. आता टाळेबंदी उठली तरीही कोणी फोटो काढण्यास येत नाही. फोटोचे दुकान उघडण्यास अद्याप परवानगीही नाही, मात्र जगायचे कसे हा प्रश्न होता. त्यामुळे फरसाण व अन्य नमकीन पदार्थाची विक्री सुरू केली आहे. व्यवसायात नवीन असलो तरी जिद्द सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया रविकांत यांनी दिली.