निवडणूक खर्च आटोक्यात ठेवण्याबाबत उमेदवार दक्ष

राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत  उमेदवाराने करावयाच्या खर्चाबाबत आयोगाने मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवार खर्चाचा आकडा २८ लाख रुपयांच्या वर जाणार नाही, याची काळजी उमेदवारांकडून घेतली जात आहे.

बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांकडून खर्चाचा तपशील दाखवण्यासाठी तीन दिवस उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवाराला २८ लाखांची खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंतच्या खर्चाचा रोजचा व प्रत्येक गोष्टीच्या खर्चाचा हिशोब निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना द्यावा लागत आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून १७ उमेदवार तर ऐरोली मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

खर्चाची माहिती उमेदवाराचा प्रतिनिधीही ही माहिती सादर करु शकतो. त्यामध्ये सर्व खर्चाच्या तपशीलासह बॅंक स्टेटमेंट, बॅक रजिस्टर ,कॅश रजिस्टर यासह सर्व प्रकारची बिलेही सादर करावी लागणार आहेत.

याबतची सर्व माहिती सिडको गेस्ट हाऊस,किल्ले गावठाण येथे १० ते ५ यावेळात खर्चाचा सर्व तपशील द्यावा लागणार आहे.

उमेदवारांवरील टेहळणी अशी..

ल्ल निवडणुकीच्या खर्चात प्रत्येक उमेदवाराचा प्रचारासाठी दिवसभरात होणाऱ्या खर्चाची इत्यंभूत माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागते. त्यात प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी, मोठी वाहने यासह ध्वनिवर्धक, झेंडे आणि फलक  याबाबतची माहिती द्यावी लागत असते.

ल्ल संपूर्ण निवडणूक काळात आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंतचा खर्च यात दिवसागणिक देणे बंधनकारक असते. तसेच उमेदवाराने दिलेल्या खर्चाची खातरजमा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबतचे पथक याबाबत काम करते.

ल्ल उमेदवाराने खर्च कमी दाखवला तरी आयोगामार्फत नेमण्यात आलेले भरारी पथके, चित्रीकरण पथक तसेच विविध विविध ठिकाणी असलेली नाकाबंदी पथके यांच्याद्वारे कोठेही आचारसंहितेचा भंग होत नाही ना याबाबत लक्ष ठेवून खर्चाचीही माहिती घेत असते.

ल्ल त्यामुळे नेहमीपेक्षा दरवेळेच्या नियमावलीत अधिक कठोर नियम करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. यात प्रत्येक उमेदवारावर आचारसंहिती पथकाचे  आणि खर्चाची माहिती घेणाऱ्या पथकाचे नियंत्रण असते.

प्रचार, सभा, मिरवणूक यासह सर्व खर्च लक्षात घेऊन उमेदवाराचा खर्च २८ लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त झाला तर त्याला अपात्रही ठरवण्यात येते. त्यामुळे नियमांची अमंलबजावणी योग्य रितीनेच करावी लागते. -ज्ञानेश्वर खुटवड, निवडणूक अधिकारी ,बेलापूर मतदारसंघ