|| विकास महाडिक

विजय चौगुले यांच्या मध्यस्थीनंतर मंदा म्हात्रेंना पाठिंबा; चौगुलेंच्या खेळीमुळे शिवसेनेची कोंडी:- बेलापूर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड करून अपक्ष अर्ज भरणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेत म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला. माने यांनी माघार घेण्यामध्ये शिवसेनेचे पालिकेतील विरोधी पक्षनेते व वडार समाज समितीचे सभापती विजय चौगुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ऐरोलीत भाजपचे गणेश नाईक यांच्याविरोधात अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत असलेल्या विजय नाहटा यांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावण्याचे कामही चौगुले यांनीच केले होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेत राहून भाजपसाठी काम करणारे चौगुले यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे रीतसर प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे.

‘बेलापूर मतदारसंघात बंडखोरी करण्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. मतदानाचा दिवस जवळ येत असताना मागे वळून पाहिल्यानंतर एकही नेता आपल्या मागे नसल्याची जाणीव झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी माघार घेण्यासाठी दोन वेळा फोन आल्याने आपण माघार घेत आहे,’ असे माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ही बंडखोरी मागे घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील जिल्हाप्रमुखांनी आपल्याशी कोणताही संर्पक साधला नसल्याचे माने यांनी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचे नाव न घेता जाहीर केले. माने हे सातारचे मूळ रहिवाशी आहेत. माने यांनी घेतलेल्या माघारीमागे पालकमंत्री शिंदे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले या दोन ‘सातारकरांचे’ प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने माघार घेणारे चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांचे ‘मांडलिकत्व’ पत्करले आहे. त्यामुळे यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या वडार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. शिवसेनेत राहून भाजपचे आदेश मानणाऱ्या चौगुले यांनी ऐरोली मतदारसंघात राजकीय गुरू, माजी मंत्री उमेदवार गणेश नाईक यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात काही ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर शिवसेनेतील उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. ऐरोली मतदारसंघात नाईक यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने विजय नाहटा यांना अपक्ष उभे करण्याची खेळी रचली होती. पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी तसे जाहीर केले होते. त्याला पहिला खो चौगुले यांनी घातल्याने हा प्रयोग फसला. त्यामुळे नाईक यांचा ऐरोलीतील सामना एकतर्फी झाला आहे. नाईक यांच्यासाठी पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची एक बैठक देखील चौगुले यांनी आयोजित केली होती. त्याला शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. त्या म्हात्रे यांना चौगुले यांनी फोनवर धमकी दिल्याने त्यांच्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनाही जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे. चौगुले यांना थेट मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त लाभल्याने ते सध्या कोणालाही धमकवण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. याच संबंधांचा उपयोग करून त्यांनी बेलापूरमधील शिवसेनेचे बंडखोर विजय माने यांना भाजपच्या उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी माघार घेण्यास भाग पाडले असल्याची चर्चा आहे.

भाजपचा मार्ग सुकर

चौगुले यांना शिवसेनेने एक वेळा खासदारकी व दोन वेळा आमदारकीची उमेदवारी दिलेली आहे. या तिन्ही निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकीत निवडून आणलेल्या काही नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेतले आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप असताना शिवसेनेने गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. नवी मुंबईत आता जास्त काळ डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वडार समाजाचे राज्य पातळीवरील संघटन करून मुख्यमंत्र्यांना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्यांना आता राज्यमंत्री दर्जा असलेल्या समितीचे सभापती पद मिळाले आहे. समाजाचे राज्य पातळीवर काम करणाऱ्या चौगुले यांनी नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेत राहून भाजपचा मार्ग सुकर केला आहे. चौगुले यांच्या भाजपप्रेमामुळे शिवसेनेची मात्र शहरात पीछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे.