शिवसेनेचे आव्हान नसणे, विखुरलेली राष्ट्रवादी यांमुळे नवी मुंबईत भाजप निश्चिंत

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ऐरोली मतदारसंघात माजी मंत्री गणेश नाईक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे गणेश शिंदे अशी लढत होणार आहे. परंतु ही लढत किरकोळच असेल, असे मानले जात आहे. मनसेचे नीलेश बाणखेले हे या मतदारसंघातील काही हजार मते पदरी पाडून घेतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नाईकांना मताधिक्य किती मिळते, हाच भाजप कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय आहे.

नाईक यांनी यापूर्वी जुन्या बेलापूर मतदारसंघात एक लाख नऊ हजार आणि एक लाख १८ हजार असे दोन वेळा मताधिक्य मिळविले आहे. आता याच मतदारसंघातून  ऐरोली हा चार लाखांचा छोटा मतदारसंघ तयार झाला आहे. त्यात मताधिक्य मिळविणे तसे अशक्य होते मात्र निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे नाईकांच्या समोर तुल्यबळ उमेदवारच उभा नाही.

शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी त्यांच्यासमोर अपक्ष म्हणून राहाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु  त्यांनी माघार घेतल्याने आता नाईकांव्यतिरिक्त इतर किरकोळ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिल्याने ही लढत एकतर्फी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या तालमीत तयार झालेले कोपरखैरणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे या निवडणूक राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर नाईकांसारखा प्रबळ उमेदवार उभा असल्याने ही लढत एकतर्फी झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवख्या उमेदवाराने दिग्गज नेत्यांना कात्रजचा घाट दाखवल्याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय विचारपूर्वक सर्वसाधारण माथाडी कामगार उमेदवार म्हणून दिला आहे. दोन्ही मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार हे एपीएमसी बाजाराशी निगडित आहेत. शिंदे हे माथाडी कामगारांची बलाढय़ संस्था असलेल्या कामगार संघटनेचे सरचिटणीस आहेत. त्यामुळे ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे आणि घणसोली या शहरी भागात असलेले माथाडी कामगार ‘आपला उमेदवार’ म्हणून त्यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. पवारांना दगाफटका करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याचा चंग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे पवार नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघासाठी प्रचार सभा घेणार आहेत.

याशिवाय राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी नाईकांना जेरीस आणण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने काँग्रेसचे काही जुनेजाणते स्थानिक नेते नाईकांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. नाईकांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, तसेच सामाजिक कारकीर्दीत दोन पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते विरोधक म्हणून तयार झाले आहेत. नाईकांच्या पराभवासाठी ठाणेकर नेते नेहमीच उत्साही असल्याचे दिसून येते. त्यामुळे अगोदर नाईकांना अपशकुन करण्यासाठी पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू करण्यात आली होती, मात्र भाजपाला नाईकांपेक्षा ‘एक जागा’ महत्त्वाची असल्याने मुख्यमंत्र्यांनी युती धर्म पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नाहटासाठी असंतुष्ट शिवसैनिक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे विरोधक काम करणार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत नाहटा रिंगणात असते तर मनसेने उमेदवार उभा         केला नसता, अशी चर्चा आहे. नाहटा रिंगणात नसल्याने ही सर्व ताकद नाईकांच्या विरोधात शिंदे यांच्यासाठी वापरली जाणार आहे. या सर्व विरोधकांचा सामना करीत नाईकांना या निवडणुकीत मताधिक्य घेण्याची अपेक्षा आहे. हा मतदार संघ यापूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. नाईकांचे पुत्र संदीप नाईक या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आल्याने त्यांचे वडील या मतदारसंघातून निवडून येणे महत्त्वाचे नाही. चार लाखांच्या या मतदारसंघात नाईकांना जास्त मताधिक्य मिळविणे हेच खरे आव्हान आहे. बेलापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादीचे अशोक गावडे हे या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. मंदा म्हात्रे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर आजही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी कडवी झुंज देण्याच्या प्रयत्नात राहणार नाही. गावडे हे एक नगरसेवक असून संपूर्ण मतदारसंघाला अनभिज्ञ आहेत. नाईकांच्या फुटीनंतर पवार यांच्यावर निष्ठा व्यक्त करणारे ते एकमेव नगरसेवक आहेत. या मतदारसंघात एक मनसेचे गजानन काळे व शिवसेनेचे बंडखोर विजय माने हे दोन परिचित चेहरे आहेत. दोन्ही उमेदवार हे पक्षाचे शहर प्रमुख असून नागरी समस्यांवर केलेली उत्स्फूर्त आंदोलने हे काळे यांची जमेची बाजू आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले होते, पण त्यांची झेप चार हजार मतांच्या पुढे गेलेली नाही. माने यांची ओळख शिवसेनेचे शहर प्रमुख इतकीच असून त्यांनी पदाचा राजीनामा देऊन ही निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची हकालपट्टी अटळ आहे. यामागे पक्षातील काही स्थानिक नेत्यांची फूस असण्याची शक्यता आहे मात्र माने वेगळ्या चिन्हावर या मतदारसंघात टिकाव धरू शकणार नाहीत.

ऐरोली मतदार संघ

  •  ऐरोली विधानसभे साठी एकूण १९ जणांनी अर्ज भरले होते पैकी १३ अर्ज वैध ठरले तर सहा अर्ज बाद झाले व दोघांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ऐरोलीच्या मैदानात ११ उमेदवार असतील.
  •  प्रमुख उमेदवार-गणेश नाईक ( भाजप), गणेश शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), नीलेश बाणखेले (मनसे), जैसवाल राजेश गंगाप्रसाद (बसपा).
  •  इतर उमेदवार -दिगंबर जाधव (संघर्ष सेना), प्रकाश ज्ञानेश्वर ढोकणे  (वंचित बहुजन आघाडी), संगीता टाकळकर (रिपब्लिकन बहुजन सेना) हरजितसिंग कुमार— इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी)
  •  अपक्ष उमेदवारांची यादी- अ‍ॅड. बापू पोळ, विनय दुबे, आणि हेमंत पाटील.
  •  माघार घेणारे उमेदवार-दत्तात्रय साबळे, प्रीती हर्ष

बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात

  •   प्रमुख उमेदवार- बेलापूर मतदार संघात भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे, मनसेचे गजानन काळे,बंडखोर अपक्ष विजय माने,यासह एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत.
  •  शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शहरप्रमुख विजय माने यांनी माघार न घेतल्यामुळे बेलापूरमध्येही युतीत बंडखोरी कायम आहे.
  •  माघार घेणारे उमेदवार : अनिल शालिक घोगरे, अभय दुबे

पनवेल मतदारसंघ

माघार घेणारे उमेदवार-पनवेल विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे अपक्ष बबन पाटील, शेकापचे गणेश कडू आणि अरुण कुंभार यांनी माघार घेतली.

ल्ल युती विरुद्ध शेकाप – १३ उमेदवारांपैकी दहा उमेदवार  निवडणूक लढवतील. सोमवारी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार बबन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे माघार घेतल्याने पनवेल विधानसभेच्या निवडणुकीत युती अभेद्य असून त्याविरुद्ध शेकाप आघाडी असे चित्र असेल.

उरण मतदारसंघात एक अर्ज अवैध

उरण विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. या अर्जाची शनिवारी छाननी केली. त्या वेळी उरणच्या निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांना ११ पैकी एक अर्ज अवैध ठरवला आहे. हा अर्ज अपक्ष उमेदवाराचा होता.