भ्रष्टाचाराच्या गर्तेत रुतलेल्या सिडकोला वर काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विशेष दक्षता विभागाची स्थापना करण्यात आली असून त्याच धर्तीवर आता नवी मुंबई पालिकेत दक्षता पथक नेमणार असल्याची घोषणा नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पारदर्शक कारभाराला प्राधान्य देताना भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा संदेशच मुंडे यांनी दिला असून पालिकेत दक्षता अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी गेली वीस वर्षे केली जात आहे.
नवी मुंबई पालिका आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारणाऱ्या मुंडे यांनी थेट आपले दालन न गाठता प्रवेशद्वारापासून सर्व विभागांना भेटी देत आपल्या दालनात जाण्याचा वेगळा प्रयोग केला. या प्रवासात त्यांनी काही अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यात लेखा विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा विभाग अधिकाऱ्यांना नसलेला पत्ता आश्र्चयचकित करणारा वाटला. विभागांना अचानक भेटी दिल्याने हे आयुक्त इतर आयुक्तांसारखे थेट तिसऱ्या मजल्यावर जाणारे नसल्याचा संदेश कर्मचारी आधिकाऱ्यापर्यंत पोहोचला. सोलापूर, वाशिम या ठिकाणी आपल्या कामाची वेगळी चुणूक दाखविणाऱ्या मुंडे यांनी विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दक्षता पथक नेमणार असल्याची घोषणा करून सर्वानाचा धक्का दिला आहे. सिडकोत पोलीस अतिरिक्त महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभाग स्थापन करण्यात आला असून या विभागाने जमिनीचे अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे सिडकोचे होणारे करोडो रुपयांचे नुकसान तर टळले पण जमीनदेखील वाचली आहे. पालिकेत जमिनीचे घोटाळे झाले नसले तरी कामांचे फार मोठे घोटाळे झाले असून त्याकडे आजमितीस दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येते.

कळंबोली ते दिघा जलवाहिनी, भोकरपाडा येथील विद्युत पंप, स्काडा, पारसिक हिलवरील जलकुंभ, गुरुत्वाकर्षण शक्तीने शहराला होणारा पाणीपुरवठा, मलवाहिन्या, मुख्यालय, वंडर पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिभवन यांसारख्या मोठय़ा कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे वाजवीपेक्षा जास्त दराने करण्यात आली आहेत. याशिवाय मालमत्ता व एलबीटी विभागात यापूर्वी अनेक अफरातफरी झाल्या असून त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी पालिकेचा वेगळा दक्षता विभाग असावा अशी मागणी केली जात होती. मुंबई पालिकेत अशा प्रकारचा तांत्रिक विभाग असून तो स्थापत्य, विद्युत कामांची तपासणी करीत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत तांत्रिक निष्णात अधिकारी असलेले एक पथक नेमले जाणार आहे.