५० पेक्षा जास्त वाहनांची मोडतोड; शहरात रात्रीपर्यंत हिंसाचार

नवी मुंबई मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागले. सर्वाधिक तणाव कोपरखैरणे परिसरात होता. तिथे सकाळी सातपासून रात्रीपर्यंत हिंसाचार सुरू होता. कोपरखैरणे डीमार्ट बीट चौकीला आणि एका गाडीला आग लावण्यात आली. ५० पेक्षा जास्त वाहनांची मोडतोड करण्यात आली. यात दुचाकींनाही वगळण्यात आले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केल्या.

‘एक मराठा लाख मराठा’ आणि ‘काकासाहेब शिंदे अमर रहे’च्या घोषणा देत बंद १०० टक्के यशस्वी करण्यात आला. शहरातील सर्व दुकाने बाजारपेठा बंद राहिल्या तर माथाडी कामगारांनीही आदल्या दिवशीच बंदमध्ये उडी घेतल्याने एपीएमसी बाजारातही शुकशुकाट होता. सकाळी फळ आणि भाजी बाजारामध्ये आवक झाली, दहाच्या सुमारास हे दोन्ही बाजार बंद करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी नियोजनबद्धरीत्या बंद यशस्वी केल्याचे दिसले. सकाळी आठच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त सेक्टरच्या आतील भागात तसेच गावठाणातील अगदी छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांत फिरून एकूण एक दुकान बंद पाडण्यात आले. सकाळी साडेसात-आठच्या सुमारास कोपरखैरणे डीमार्ट चौक बंद करण्यात आला. बाराच्या सुमारास वाशीला जोडणारे अन्य मार्गही बंद करण्यात आले.

वाशी, कोपरखैरणेचा संपर्क तुटला. हीच गत घणसोली, सानपाडा, नेरुळ आणि अन्य ठिकाणीही होती. मात्र सर्वाधिक दाहकता कोपरखैरणेत दिसली. तेथील डीमार्ट, तीन टाकी, एमएसईबी आणि हॉटेल जायका या सलग चारही चौकांत वाहनांची नाकाबंदी करण्यात आली. डीमार्ट येथे दुपारी एकपर्यंत ४०-५० वर्षे वयोगटातील आंदोलनकर्ते सर्वाधिक होते. दुपारनंतर तरुणांची गर्दी लक्षात येण्याजोगी होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.