मराठा आरक्षणावरून राज्यात अनेक ठिकाणी रणकंदन झाले. नवी मुंबई परिसरात हिंसाचार झाला. कळंबोळीतील हिंसाचार दुसऱ्या दिवशी शमला, मात्र कोपरखैरणे धुमसत राहिले. पोलिसांना जे कळंबोलीत शक्य झाले ते कोपरखैरणेत का शक्य झाले नाही, हा खरा प्रश्न आहे.

नवी मुंबई हे अठरापगड जातींचे शहर आहे. या ठिकाणी आता कोणत्याही एका समाजाची, जातीची अथवा धर्माची मक्तेदारी नाही. ज्यांच्या जमिनींवर हे शहर वसवले गेले आहे. त्या आगरी कोळ्यांची संख्या देखील १८ टक्केच उरली आहे. खरे तर शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूस असलेल्या २९ गावांतील प्रकल्पग्रस्त हेच या शहरातील बहुसंख्याक आहेत. या गावांतील बेकायदा बांधकामांमुळे परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या तुलनेत प्रकल्पग्रस्तही अल्पसंख्याक ठरू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांनतर नवी मुंबईत सर्वाधिक संख्या ही माथाडी कामगारांची आहे. मुंबईत विखुरलेले घाऊक बाजार नवी मुंबईत एकटवल्याने या व्यवसायाचा प्रमुख घटक असलेले माथाडीदेखील इथेच केंद्रित झाले. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ, तुर्भे या सिडको नोडमध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्राबल्य जास्त आहेत. यात मुंबईतून नवी मुंबईत विस्थापित झालेल्या कोकणातील मराठा समाजाच्या कुटुंबांचीही भर पडली आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर दिल्या जाणाऱ्या लढय़ाला नवी मुंबईतून फार मोठय़ा प्रमाणात कुमक पुरवली जात होती.

नवी मुंबईत आंदोलनाची धार तीव्र केल्यास सरकारचे लक्ष जाईल, असे आडाखे येथील नेत्यांनी मांडले होते. माथाडी संघटनेचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडे गेली दोन वर्षे हे नेतृत्व आपसूकच आले आहे. ते त्यांना कोणी बहाल केले नव्हते. मोर्चाचे नियोजन, त्यासाठी लागणारी रसद पुरविण्याचे काम माथाडी संघटनेतून होत आहे. यात राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व मंत्री शशिकांत शिंदे यांचादेखील सहभाग आहे.

नवी मुंबईतून दोन प्रमुख रस्ते जात असून त्यावरील आजची वाहन संख्या ही पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. मुंबईला जोडलेल्या या दोन्ही मार्गावरील वाहतूक अडवली की सरकार खडबडून जागे होईल, असा अंदाज बांधत आंदोलकांनी प्रथम कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अडवली. रास्ता रोको केले. त्याची पुनरावृत्तीनंतर वाशी गावाजवळ, शिरवणे, सानपाडा येथे झाली. कळंबोलीतील आंदोलकांच्या तावडीतून सुटलेल्या वाहनचालकांना या चार टप्प्यांत अडवण्यात आले. पुणे, गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मुंबईत तर अडविले जात होतेच पण त्यातूनही वाचलेल्या वाहनचालकांना वाशीत झळ बसली. यापूर्वीच्या आंदोलनांमुळे मराठा मोर्चाचे सर्वत्र कौतुक केले जात होते, मात्र मंगळवारच्या मोर्चामुळे मराठा समाजाचा तिरस्कार केला गेला. रास्ता रोको करताना वापरलेली भाषा, वाहनचालकांना केलेली मारहाण, रुग्णवाहिका, अंत्यसंस्काराला जाणाऱ्यांनाही केलेला मज्जाव, प्रसारमाध्यमांना केलेली धक्काबुक्की, दमदाटी सर्वच अनाकलनीय होते. ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्गावर केलेले रास्ता रोको एक वेळ समजण्यासारखे आहे पण वाशी, कोपरखैरणे, पामबीचसारख्या अंतर्गत मार्गावर केलेली हुल्लडबाजी चीड आणणारी होती. कोपरखैरणेतील प्रकरण चिघळण्यामागे ही नाकाबंदी कारणीभूत ठरली. पोलिसांची हतबलता एका तरुणाचा जीव जाण्यास कारण ठरली. त्यांना कारवाई करण्यास मनाई करण्यात आल्याने कोणीही त्यांना टपली मारून जात होते. कोपरखैरणे येथे त्याच रात्री एका तरुणाची हत्या झाल्यानंतरही पोलीस कुमक कमी होती. हत्या का झाली हे पोलीस शोधत आहेत.

तणाव निर्माण होईल याचा पोलिसांना अंदाज आला नाही किंवा पोलिसांनी आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. आता जात-पात-धर्म-प्रांतांच्या सीमारेषा दूर करून सामंजस्याची गरज आहे.

अनेक वर्षांपासूनचा तणाव?

दोन समाजांतील तणाव या हत्येमागे असण्याची शक्यता आहे. त्याला मराठा मोर्चाचा काही आधार नाही. हा तणाव गेली अनेक वर्षे झिरपत आहे. नवीन प्रकल्प उभे राहणाऱ्या कोणत्याही गावात हा तणाव कायम असल्याचे दिसते. तसा तो नवी मुंबईतदेखील आहे. त्याचे परिणाम काही वर्षांपूर्वी घणसोली दंगलीत दिसून आले होते. या दंगलीत तीन तरुणांना नाहक जीव गमवावा लागला होता.