पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई : शासनाने ५० टक्के आसनक्षमतेवर चित्रपटगृहे व नाटय़गृहे सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर नाटय़निर्मात्यांच्या मागणीनुसार प्रयोगासाठी भाडय़ात ७५ टक्के सूटही देण्यात आली. मात्र तरीही वाशीतील भावे नाटय़गृहात तिसरी घंटा झालीच नाही. एकही प्रयोग अद्याप या ठिकाणी लावण्यात आला नाही. नाटय़निर्मात्यांना अजूनही नाटय़रसिकांच्या प्रतिसादाची चिंता सतावत आहे.

नाटय़निर्मात्यांना ५० टक्के आसन क्षमतेत खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा याबाबत अंदाज येत नसल्याची खंत काही नाटय़निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

करोनामुळे बंद असलेली सिनोमागृहे व नाटय़गृहे अखेर शासनाने नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र करोनाचे संकट अद्याप असल्याने यासाठी गर्दी होऊ नये म्हणून ५० टक्के आसनक्षमतेची अटक घालण्यात आली. यामुळे नाटय़प्रयोगासाठी येणारा खर्चही निघणार नसल्याने नाटय़निर्मात्यांनी नाटय़गृहाच्या भाडय़ात कपात करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानुसार महापालिका क्षेत्रांतील अनेक नाटय़गृहांचे भाडे ७५ टक्के कमी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

नवी मुंबई महापालिकेनेही येथील एकमेव भावे नाटय़गृहाच्या नाटय़प्रयोगासाठी भाडय़ात ७५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप या ठिकाणी एकही नाटय़प्रयोग लावण्यात आलेला नाही.

भावे नाटय़गृहात २५ ते ३५ टक्के नोंदणी होते. त्यात आता करोनामुळे प्रक्षेकसंख्या आणखी कमी होण्याची भीती आहे. इतक्या कमी प्रक्षेकसंख्येत नाटय़प्रयोगातून प्रयोगासाठी येणारा खर्चही निघणार नाही. त्यामुळे नाटय़निर्माते या ठिकाणी प्रयोग लावण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याच्या मन:स्थितीत आहेत.

डिसेंबरअखेर नाटय़प्रयोग

येत्या पंधरा दिवसांत पुणे आणि मुंबईमध्ये भारत जाधव, प्रशांत दामले यांच्या ‘सही रे सही’ आणि ‘एका लग्नाची गोष्ट ’या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. या नाटकांना नाटय़रसिकांची कशी दाद मिळते यावर पुढील नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर भावे नाटय़गृहात प्रयोग लागण्याची शक्यता आहे.

एका नाटय़प्रयोगासाठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च देखभल दुरुस्तीवरही होतो. त्यात या ठिकाणी प्रयोगांसाठी कमी प्रतिसाद मिळतो. करोनानंतर किती प्रतिसाद मिळेल याचाही नाही. त्यामुळे आर्थिक गणित जुळत नाही. डिसेंबरमध्ये काही नामवंत नाटकांचे प्रयोग होतील, त्यांनतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

-रत्नकांत जगताप, कार्यकारी निर्माता, रंगमंच कामगार संघ