मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; मतदारांची १५ जानेवारीपर्यंतची यादी ग्राह्य

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची गेल्या वर्षी होणारी पालिका निवडणूक करोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा १११ प्रभागांसाठीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठीचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १ मार्च २०२० रोजीच १११ प्रभागांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली होती. त्यामध्ये अनेक मातब्बरांचे आरक्षण महिलांसाठी आरक्षित झाल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर प्रभाग आरक्षण व प्रारूप प्रभाग रचनेवर ५२४ हरकतींची नोंद करण्यात आली होती. करोनाच्या संकटामुळे १७ मार्च २०२० रोजीच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ पर्यंतची यादीच ग्राह्य धरली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत असलेल्या १११ प्रभागांनुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून पालिकेचे प्रारूप याद्या तयार करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर व ऐरोली मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत येणाऱ्या मतदारांची १५ जानेवारीपर्यंतची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीन टप्पे असतात. त्यामध्ये प्रभाग रचना तसेच विधानसभानिहाय तयार केलेल्या मतदार याद्यांचे प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय विभाजन व प्रत्यक्ष निवडणूक असा कार्यक्रम असून मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पालिकेत वेगाने कामाला सुरुवात होणार आहे. करोनातून सावरत असलेल्या शहराला आता पालिका निवडणुकीचे वेध लागणार आहेत.

मतदार यादीचा कार्यक्रम असा…

  •  प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- १६ फेब्रुवारी २०२१
  •  प्रारूप यादीवर हरकती, सूचना कालावधी- १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी
  •  प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- ३ मार्च २०२१
  •  मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे- ८ मार्च २०२१
  •  अंतिम प्रभागनिहाय व मतदार केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध- १२ मार्च २०२१