४६०६६ पैकी १०५० मतदारांकडूनच छायाचित्रे जमा

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये ४५ हजार मतदारांच्या नावांसमोर त्यांचे छायाचित्र नसल्याने संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या आठवडय़ात पनवेलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेरची मुदत देत छायाचित्र देण्याचे आवाहन केले होते. मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. ४६०६६ पैकी १०५० मतदारांनीच छायाचित्र सादर केली आहेत.

यापूर्वीही मतदारांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि ‘बीएलओं’कडे त्यांचे छायाचित्र मतदार यादीत नोंद होण्यासाठी दिले होते. मात्र त्यानंतरही छायाचित्रांचा यादीत समावेश केला नाही.

पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण ५६७१३६ मतदार होते. त्यापैकी ३,०३.८६१ पुरुष तर २,६३,२७३ स्त्री मतदारांची नोंद होती. यातील ४६,०६६ मतदारांच्या नावापुढे मतदारांचे छायाचित्र नसल्याने या मतदारांची नावे मतदार यादीत वगळण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. यासाठी मतदारांना छायाचित्र देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यासाठी काढण्यात आलेली जाहीर नोटीस ही ११ वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. २ ऑगस्टपर्यंत १०५ मतदारांनी त्यांची छायाचित्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विभागाकडे जमा केली आहेत. उर्वरित ४५ हजार नावांच्या मतदारांपर्यंत निवडणूक आयोगाचे जाहीर आवाहन पोहचू शकले नाही.