गाळ काढण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
एके काळी जलपर्णीच्या गालिचावर डोलणाऱ्या कमळांनी नटलेल्या वडाळे तलावाला आता दुष्काळी भूमीची अवकळा आली आहे. गाळ काढण्यासाठी जलसंधारण विभागाकडून मदत मिळण्याच्या आशेवर असलेल्या पालिकेला निवडणुकीच्या कामातून या तलावासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमीच आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ न काढल्यास पुन्हा तलाव सुकण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कमळांच्या या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
वडाळे तलाव हे एके काळी या परिसराचे भूषण होते. या तलावाच्या छायाचित्रांवर अनेकांनी स्पर्धा जिंकल्या. अनेकांची मैत्री, प्रेम या तळ्याकाठी फुलले. मात्र सध्या त्या सौंदर्याचा मागमूसही दिसत नाही. पालिका प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे वडाळे तलावातील कमळांचे बीजच नष्ट झाले आहे. ३० एकरांवर हा तलाव आहे. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. तलावातील पाणी समुद्रात सोडून तलाव पूर्ण रिकामा करण्यात आला. वर्षांनुवर्षे साचलेला गाळ काढण्यासाठी जलसंधारण विभाग पालिकेला मोफत यंत्र देणार होता; परंतु आयुक्त शिंदे यांच्या बदलीनंतर जलसंधारण विभाग व पालिका प्रशासनाने या तलावाकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्याचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे निवडणूक कार्यक्रमात पूर्णपणे व्यग्र असल्यामुळे त्यांना या तलावाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आयुक्त निंबाळकर यांनी ३१ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शहरातील विविध तलावांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
जलसंधारण विभागाने यंत्रे दिल्यावर त्यांच्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निधीतून केला जाणार होता; परंतु एप्रिल व मेमध्येच तलावातील गाळ न काढल्यास पुन्हा जैसे थे स्थिती होईल आणि जून महिन्यातील पावसानंतर पुन्हा पाणी साचेल. तसे झाल्यास साधारण ऑक्टोबपर्यंत सुशोभीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. याबाबत आयुक्त निंबाळकर यांना विचारले असता त्यांनी या तलावाच्या कामाबद्दल माहिती घेतो. सध्या निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचे सांगितले.
तलावाची वैशिष्टय़े
’ तलावामध्ये स्थलांतरित पक्षी येत असत.
’ कमळांचे बीज मोठय़ा प्रमाणात होते
’ जलचरांचा वावर होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 3:51 am