सहा महिन्यांपूर्वीचा प्रस्ताव लालफितीत; अकादमीसाठी एमसीएची तत्परता, पालिकेची उदासीनता

नवी मुंबई नवी मुंबई शहरात पालिकेची मालकी असलेल्या राजीव गांधी मैदानावर मुंबई क्रिकेट असोसिएशनची तयारी असतानाही झोनल अकादमी अद्याप सुरू न झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची भावना अद्यापही खदखदत आहे. तर रणजी सामन्यासाठी कौतुकास पात्र असलेल्या या मैदानावर काही सुविधा न केल्यामुळे नवी मुंबईकर रणजी सामने पाहण्यापासून मुकले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने येथे क्षेत्रीय अकादमी सुरू करण्याची तयारी दर्शविली होती तरीही महापालिका त्यासाठी का प्रयत्न करीत नाही याबाबत अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींनी उपस्थित केले आहेत.

नवी मुंबई शहरात मुंबई क्रिकेट असोसिएशनची क्षेत्रीय अकादमी सुरू करण्यासाठी अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी  ४ नोव्हेंबर २०१७ रोजी राजीव गांधी मैदान पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यावस्थापकीय समितीचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे तसेच समितीचे सदस्य श्रीकांत तिगडी, खेळपट्टी तज्ज्ञ राजू गोडबोले, तसेच अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, क्रीडा प्रशिक्षक विकास साटम यांचा सहभाग होता. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या पालिकेचे हे राजीव गांधी मैदान अकादमीसाठी पसंत पडले. त्याचबरोबर रणजी क्रिकेट सामने खेळवण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.

पदाधिकाऱ्यांनी या वेळी पालिकेच्या मैदानाचे कौतुकही केले होते. परंतु क्षेत्रीय अकादमी व रणजी सामने खेळवायचे असतील तर मैदानावर काही महत्त्वाची कामे करण्याच्या सूचना त्यांनी त्या वेळी महापालिकेने केल्या होत्या.  पाहणी दौऱ्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप मैदानावर कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत. सूचनेप्रमाणे मैदानावर करावयाच्या कामांचा प्रस्तावही तयार करण्यात आला परंतु अजूनही तो लालफितीतच अडकला आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची झोनल अ‍ॅकॅडमी होणार का, रणजी सामने पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार का, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

पालिकेने फुटबॉलचा उदो उदो करीत  कोटय़वधींचा खर्च केला परंतु आपल्याच शहरातील तरुण क्रिकेटपटू निर्माण करण्याच्या संधीकडे त्यांचा कानाडोळा होत असल्याबद्दल खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील मुलांना चांगली संधी प्राप्त करून देण्यासाठी पालिकेने  त्यासाठी गांभीर्याने पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गरजेचे आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबईतील ‘बीकेसी’ येथे जाऊन एमसीएचे मैदान पाहण्याचे  पालिका अधिकाऱ्यांचे ठरले होते. त्या मैदानाच्या पाहणीसाठीही ६ महिने मुहूर्त मिळाला नाही, असे सूत्रांकडून सांगितले जाते.

२८ फेब्रुवारी २००९ रोजी राजीव गांधी स्टेडियमचे उद्घाटन झाले तेव्हापासून या मैदानावर विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पालिकेने या मैदानासाठी नुकताच सुमारे १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून देखणे क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी देशाचे नाव मोठे केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे  व नवी मुंबईत या चार ठिकाणी झोनल अकादमी असोसिएशनचे प्रयत्न सुरू आहेत.

अकादमी झाल्यास नवी मुंबईसह शहरातील १४, १६, १९ वर्षांखालील मुलांना तर १९ वर्षांखालील मुलामुलींना मोफत प्रशिक्षण मिळेल. त्यातूनच चांगल्या खेळडूंना मुंबई क्रिकेट संघासाठी व भविष्यात देशासाठी खेळण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेने या कामांचे नियोजन केले तर किमान पुढील क्रिकेट हंगामापूर्वी तरी झोनल अकादमी सुरू करता येईल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जाते.

नुकताच या विभागाचा कारभार माझ्याकडे  आला आहे. पालिकेच्या मैदानांबाबत गुरुवारी सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन माहिती घेतली आहे. राजीव गांधी मैदानांवरील सुधारणांबाबत आयुक्तांशी योग्य चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

– नितीन काळे,उपायुक्त क्रीडा विभाग

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत राजीव गांधी मैदानाची पाहणी केली होती. परंतु त्यानंतर शहरातील स्वच्छ सर्वेक्षणाचे काम सुरू होते. पालिकेने कामाबाबतचा प्रस्तावही बनविण्यात आला होता. याविषयी आयुक्तांशी बोलणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल. मैदानातील सुधारणांबाबत शहर अभियंता, क्रीडा अधिकाऱ्यांसमवेत एकत्रित बैठकही झाली होती. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात येईल.

– रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा), नमुंमपा