लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने वापरात नसलेल्या दोन ‘एनएमएमटी’ बसचा वापर मोबाइल टॉयलेटमध्ये केला असून बुधवारपासून त्या नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. गरजेनुसार ही फिरती स्वच्छतागृहे त्या त्या विभागात ठेवण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिका स्वच्छतेत राज्यात प्रथम स्थानी आहे. या वर्षी देशात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या स्वच्छता उपक्रमाअंतर्गत पालिकेने एक नावीन्यपूर्ण उपक्रम नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल केला आहे. ‘टाकाऊतून टिकाऊ’ म्हणजे पुनर्वापराच्या संकल्पनेतून सारा प्लास्ट या कंपनीने बसचे मोबाइल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले आहे, तर ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी त्यात कलात्मकता साकारली आहे.

दोन्ही बसच्या पुढील भागात महिलांकरिता व मागील भागात पुरुषांकरिता स्वच्छतागृह करण्यात आले आहे. दोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत.

आतील भागात महिलांसाठी तीन शौचकुपांची तसेच पुरुषांसाठी दोन शौचकुपांची व्यवस्था असून पुरुषांच्या भागात दोन मुतारी ठेवण्यात आल्या आहेत.

दोन्ही भागांत स्वतंत्र चेंजिंग रूमही दिल्या आहेत. बसेसच्या टपावर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे.

आमदारांकडून संकल्पना चोरीचा आरोप

पालिकेने या स्वच्छतागृहांचे बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ उद्घाटन केल्यानंतर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संकल्पना चोरीचा आरोप केला आहे. या सुविधेबाबत आपण प्रशासनाला आधीच सांगितले होते. यासाठी आमदार निधीतून ५० लाखांची रक्कमही दिली होती, परंतु पालिकेने आपल्या आधीच ही सुविधा सुरू केली. अधिकारी जाणीवपूर्वक आपल्या संकल्पना चोरून पालिकेचा उपक्रम म्हणून राबवत आहेत. यापुढे असला प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर पालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यातच तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यकाळातच या उपक्रमाबाबत नियोजन झाले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.