मुंबई आणि परिसरातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवी मुंबईत रेल्वे स्थानकात ४३ वर्षांच्या विकृताने विशीतल्या तरुणीचा विनयभंग केला. विकृत आरोपीने तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिथून पळही काढला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी त्याला अवघ्या काही मिनिटात पकडले आणि त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

तुर्भेत राहणारी २० वर्षांची तरुणी गुरुवारी सकाळी घणसोलीत ऑफीसला जात होती. तुर्भे स्थानकात लोकल ट्रेन वाट बघत ती थांबली होती. याच दरम्यान एका विकृताने तिला गाठले आणि तिला मिठी मारली. त्याने तरुणीचे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न देखील केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने तरुणीला धक्काच बसला. मात्र, तिने लगेच स्वतःला सावरले आणि त्याला प्रतिकार केला. तरुणीच्या प्रतिकारानंतर तो विकृत तिथून निघून गेला.

हा सर्व प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुममध्ये बसलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात बघितला. त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. आरोपी हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन मधील सब-वेतून जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.

नरेश के जोशी असे या आरोपीचे नाव आहे. तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशी लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून आरोपीला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.