नवी मुंबईकरांना मात्र मोरबे धरण भरण्याची प्रतीक्षा

सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि उलवा या शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पेण येथील हेटवणे धरणाने पाणीसाठय़ाची कमाल पातळी गाठली असून सिडकोने उन्हाळ्यात केलेली २० टक्के पाणीकपात निम्म्याने कमी केली आहे. हेटवणे धरणक्षेत्रात १३०८ मिमी. पाऊस पडला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीपातळी अद्याप केवळ ६९ मीटपर्यंत पोहोचल्याने पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना भर पावसात पाणीकपात सहन करावी लागत आहे. ऐरोली-कोपरखैरणेसारख्या भागात तर एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे, बारवी, पातळगंगा आणि हेटवणे या धरणक्षेत्रात गतवर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने यंदा नवी मुंबईकरांना तीस टक्क्यांपर्यंत पाणीकपात सहन करावी लागली. त्यात सिडकोच्या खारघर, तळोजा, कामोठे भागात तर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांनी सिडको कार्यालयांवर हंडा मोर्चे काढले. त्यामुळे हेटवणे धरणातील जुन्या झालेल्या पंपहाऊसची दुरुस्ती करण्यात आल्याने काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. सध्या कोकणात संततधार पडणाऱ्या पावसामुळे पेण येथील हेटवणे धरणक्षेत्रात सर्वाधिक १३०८ मिमी. पाऊस पडला असून गतवर्षीपेक्षा तो जास्त आहे. केवळ १२ दिवसांत पडलेला हा पाऊस असल्याने हेटवणे धरण भरायला आले आहे. त्यामुळे यंदा या धरणात ६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवा या सिडको नोडमधील रहिवाशांना आता पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे.

ॉ उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता सिडकोने या भागात वीस टक्के पाणीकपात केली होती. हेटवणे धरणातील पाणीसाठा वाढल्याने ही पाणीकपात दहा टक्क्यांनी कमी करण्यात आली असून शिल्लक दहा टक्के पाणीकपातही लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. सिडकोच्या शहरी भागाबरोबरच हेटवणे धरणापासून नवी मुंबईत येणाऱ्या जलवाहिनीदरम्यानच्या काही गावांनादेखील या धरणाचे पाणी दिले जात असल्याने येथील रहिवाशांचाही जीव भांडय़ात पडला आहे.