तुर्भे, शिरवणे एमआयडीसीत पाणी समस्या

नवी मुंबई : एमआयडीसी व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाणे बेलापूर एमआयडीसीत पायाभूत सुविधांअभावी उद्योजक त्रस्त असताना आता पाणी ही नवीन समस्याही भासू लागली आहे. एमआयडीसीच्या कोटय़ातील पाणी भाईंदरला दिले जात असल्याने तुटवडा भासू लागला आहे. पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ तुर्भे आणि शिरवणे एमआयडीसीला बसत असून शुक्रवारी पाणी बंद तर शनिवारी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

देशातील पहिली औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर आद्योगिक पट्टा ओळखला जातो. याचा विस्तार एवढा आहे की ती आशियातील सर्वात मोठी वसाहतीत तिची गणना होते. या एमआयडीसीत पायाभूत सुविधांअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यात आता पाणीटंचाईही भासू लागली आहे. नवी मुंबईत शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून २४ तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र लगतच्या एमआयडीसीत मात्र आता पाणी समस्या निर्माण होऊ लागली आहे.

एमआयडीसीला बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो. याच धरणातून नवी मुंबई शहरालाही ७० तर एमआयडीसीला दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र भाईंदरला पाणीपुरवठय़ात वाढ केल्याने एमआयडीसी क्षेत्राला पाणी कमी पडत असल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. यात शिरवणे आणि तुर्भे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शुक्रवारी पाणी बंद तर शनिवारी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. आठवडय़ातून जास्तीत जास्त दोन दिवस व्यवस्थित पाणीपुरवठा होतो. या एमआयडीसी काही कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असते, त्यांना याची झळ बसत आहे. त्यांना टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. बोअरचे पाणी वापरल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मात्र  कुठेही पाणी समस्या नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे.

कंपन्यांची पत घसरत असल्याच्या उद्योजकांच्या भावना

शिरवणे आणि तुर्भे हा भाग उंचावर असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे दोन मोठे पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तरीही समस्या कायम आहे. कागदी घोडे नाचवण्यात सरकारी यंत्रणा दंग आहे तर उद्योजकांसाठी एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. हा फटका केवळ उद्योजकांना बसत नसून त्याच्याशी निगडित तंत्रज्ञ, कामगार, अभियंते यांचा रोजगारावर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय कंपनीची पत घसरते, अशी संतप्त भावना शिरवणे एमआयडीसीतील उद्योजकांनी व्यक्त केल्या.

पाण्याची चोरीही

तुर्भे आणि शिरवणे एमआयडीसीत कमी दाबाने पाणीपुरवठा ही समस्या निर्माण झाली आहे. त्यात एमआयडीसीला पाणीपुरवठा होत असलेल्या मुख्य जलवाहिनीला थेट छिद्र पाडून अर्धा इंच पाइप जोडून पाणीचोरी होत आहे. एमआयडीसीमध्ये अशी शेकडो बेकायदा जोड असल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचा दावा उद्योजक हरीशचंद्र यादव यांनी केला आहे. या बाबत कार्यकारी अभियंता एमएस कलकुटकी यांना विचारले असता, या बाबत आदेश दिले असून ज्या ठिकाणी बेकायदा पाणी  जोड असेल त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरवणे भागात आठवडय़ातून दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. अन्य वेळेस कमी दाबाने पाणी यते. एक तर करोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. कसेबसे यातून आम्ही बाहेर पडत आहोत.

-दिलीप पाटील, उद्योजक, शिरवणे