वाढत्या लोकसंख्येला भविष्यात टंचाई भासू नये म्हणून तरतूद

खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेले साडेचारशे दशलक्ष लिटर क्षमतेचे मोरबे धरण नवी मुंबई पालिकेच्या ताब्यात असताना भविष्यातील पाण्याची तरतूद म्हणून पेण येथील जलसंपदा विभागाच्या हेटवणे धरणावर पालिका दावा करणार आहे. या धरणातील ४५ दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभाग सिडकोला कामोठे, द्रोणागिरी या भागातील रहिवाशांसाठी देत आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या सध्या १४ लाख आहे. खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेले मोरबे धरण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट स्थितीत असताना नवी मुंबई पालिकेने ते विकत घेतले. त्यामुळे मुंबई महापालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई पालिका ही राज्यातील दुसरी पालिका ठरली. मोरबे धरणातील पाण्याचा साठा साडेचारशे दशलक्ष लिटर आहे. तो २०३० पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पुरेसा असल्याचे मत पाणीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असताना पालिका आजही एमआयडीसीकडून ६५ दशलक्ष लिटर पाणी झोपडपट्टी व औद्योगिक भागासाठी विकत घेत आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन प्राधिकरणांचा पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात नवी मुंबईची लोकसंख्या २० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नैना क्षेत्र व पनवेलमध्ये वाढणारी लोकसंख्या विचारात घेता सिडकोने कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बाराशे कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिले आहेत. येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रोसारख्या मोठय़ा प्रकल्पांना भविष्यात पाणी लागणार आहे. पेण तालुक्यात १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हेटवणे धरणासाठीही सिडकोने आर्थिक मदत केली होती. त्याबदल्यात धरणातील ४५ दशलक्ष लिटर पाणी उरण व पनवेल तालुक्यातील सिडकोच्या विकसित नोडसाठी दिले जात आहे.  मोरबे धरणातून दररोज साडेतीनशे दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. तरीही  धरणात मुबलक पाणी आहे. समाधानकारक पाऊस पडल्यास  पाणीटंचाई देखील जाणवणार नाही. दररोज साडेचारशे दशलक्ष लिटर पाणी उपसा होऊ शकेल असे धरण हाताशी असताना हेटवणेतील पाणी मिळावे यासाठी पालिका शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. धरणाची पाणी क्षमता साडेतीनशे दशलक्ष लिटर आहे. शेजारील गावांनाही त्यातील पाणी दिले जात आहे.  संपुष्टात येऊ लागलेल्या शेतीसाठी बांधण्यात आलेल्या या धरणातील पाणी पिण्यासाठी वापरले जाणार आहे. नवी मुंबईतील इमारतींची पुनर्बाधणी, झोपडपट्टी पुनर्वसन आणि औद्योगिक नगरीत   निवासी मुभा यामुळे येथील लोकसंख्या वाढणार आहे. त्यांना  पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे, यासाठी हेटवणे धरणातील पाण्यावर दावा केला जाणार असून त्यासाठी जलसंपदा विभागाला अग्रिम रक्कम देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींची पुनर्बाधणी, झोपडय़ांचा पुनर्विकास यामुळे लोकसंख्येत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या मोरबे धरणाचे पाणी भविष्यात कमी पडेल. म्हणूनच जलसंपदा विभागाच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाण्यावर पालिका दावा करणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका