News Flash

खारघरवासीयांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या खारघरवासीयांचे पाणीसंकट अद्याप टळलेले नाही.

सिडको कार्यालयाला घेराव, मंगळवारी बैठक

गेल्या कित्येक वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे त्रस्त असलेल्या खारघरवासीयांच्या संतापाचा शुक्रवारी उद्रेक झाला. संतप्त महिलांनी सिडको कार्यालयाला घेराव घालून कामकाज बंद पाडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भेट देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्यामुळे मंगळवारी या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन सिडकोकडून देण्यात आले.

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या खारघरवासीयांचे पाणीसंकट अद्याप टळलेले नाही. आता आठवडय़ातून तीन-चार दिवस पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. याविरोधात सुमारे ५०० खारघरवासीयांनी सकाळी ९ वाजताच्या सिडको कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. धरणे भरली असताना अपुरा पाणीपुरवठा का होत आहे, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला.

दोन तासांनंतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि पाणीप्रश्नासंदर्भात मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.बैठकीत व्यवस्थापपकीय संचालक, पनवेल पालिका आयुक्त, सिडकोचे शिष्टमंडळ, आमदार सहभागी होतील.

पोलिसांशी शाब्दिक चकमक

सिडको कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाढता असंतोष पाहून पोलिसांनी खारघर पोलीस ठाण्यातील स्ट्रायकिंग फोर्सच्या १० कर्मचाऱ्यांनाही तैनात ठेवण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

अनेक वर्षांपासून आम्हाला अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सिडकोकडे अनेकदा याबाबत तक्रार करूनही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. तसेच वारंवार पाइप दुरुस्तीचे कारण पुढे करून मुख्य प्रश्नाला बगल दिली जात आहे. ही समस्या लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे.

अमर उपाध्याय, रहिवासी, खारघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:57 am

Web Title: water issue in kharghar cidco
Next Stories
1 हक्काचे मैदान, पण खेळासाठी जागा नाही!
2 एनओसीविना मैदानाची उभारणी
3 ‘सेंट जोसेफ’मध्ये भाजपचे आरती आंदोलन
Just Now!
X