पूनम धनावडे, नवी मुंबई

दोन्ही फलाटांच्या प्रवेशद्वारांवर पाण्याचा वर्षांव

नव्याने उभारण्यात आलेल्या सीवूड्स रेल्वे स्थानकाला गळीती लागली असून सबवेच्या मुख्य प्रवेशावर पाणी पडत असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दोन्ही फलाटांवर हीच परिस्थिती असल्याने स्थानाकात पाणीच पाणी झाले आहे.

सीवूड्स रेल्वे स्थानकालगत आशिया खंडातील सर्वात मोठय़ा मॉलची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे बांधकाम हे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकालगतच मॉल असून स्थानकाच्या वरील भागात वाहन पार्किंग सुविधा आहे. त्यामुळे स्थानकाचे छप्पर हे अधिक भक्कम करण्यात आले आहे, मात्र तरीही या नव्या कोऱ्या स्थानकात गळीती सुरू झाली आहे. चारही जिन्यांत पाणी गळत आहे. स्थानकात सिमेंटचे पक्के छप्पर बांधण्यात आले आहे. वरील भागातील दोन्ही स्लॅबच्या जोडणीत फट असून जोडणी बुजविण्यासाठी स्टीलचे तुकडे बसविण्यात आले आहेत. त्यातूनच पाण्याची गळती सुरू आहे. सबवेच्या प्रवेशाद्वारावरच ही गळती सुरू असल्याने जिन्यातून चढ-उतार करणारे प्रवासी भिजत आहेत.

सीवूड्स रेल्वे स्थानकाची उभारणी ही मॉलच्या बांधकामाच्या दृष्टीने करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांची सतत रहदारी सुरू असते आशा मोक्याच्या ठिकाणी पाणी गळत आहे. जिन्यातून चढ-उतार करताना घसरून पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आम्हाला सावधपणे चालावे लागते.

महादेव दौंडकर, प्रवासी

देखीलभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे, मात्र सीवूड्स रेल्वे स्थानकाचे बांधकाम हे बांधा व वापरा या तत्त्वावर एल अ‍ॅण्ड टीला देण्यात आले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे त्या विभागाचे आहे. याबाबत सिडको संबंधितांना माहिती देऊन गळती थांबविण्यासाठी सूचना देईल.

मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडकोc