कामगार कॅन्टीनसाठी दररोज ९०० लिटरचा पुरवठा
जेएनपीटी बंदरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाल्याने कामगारांसाठी विकत पाणी द्यावे लागत होते; मात्र वर्षभरापासून बंदरातील एका कार्यालयाच्या कॅन्टीनला पाणीपुरवठा करण्यासाठी कॅन्टीनच्या छतावरच आठ लाख रुपये खर्चून वातावरणातील बाष्प आणि आद्र्रता खेचून पाण्याची निर्मिती करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे रोज ९०० लिटरहून अधिक पाण्याची निर्मिती होत आहे. महागडी असली तरी बंदरातील या विभागात ५०० कामगारांसाठी असलेल्या कॅन्टीनच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
शहरी भागात पुरेसा पाऊस होईपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले जात आहे. यासाठी दिवसेंदिवस पाणी कपातीत वाढ केली जात आहे. यावर उपाय म्हणून जेएनपीटी बंदरातील कंटेनर विभागाच्या कार्यालयात असलेल्या कामगारांच्या कॅन्टीनसाठी जेएनपीटी प्रशासनाने आठ लाख रुपये खर्च करून उष्णतेमुळे होणारे बाष्प व आद्र्रता खेचून घेऊन त्यापासून उत्तम पिण्याचे पाणी तयार करणारे यंत्र बसविलेले आहे. या यंत्रामुळे चोवीस तास चालणाऱ्या कामगारांच्या कॅन्टीनला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी वाचविण्यासाठी पर्जन्य जलसंधारण केले जाते. त्यातील हा एक प्रयत्नांचा भाग म्हणता येईल.

निर्मिती कशी होते
वातावरणातील २० ते ४५ डिग्री सेल्सिएस तापमान व ३० टक्के आद्र्रता हे यंत्र शोषून घेते. त्यातून दिवसाला जवळपास ७०० लिटर पाणी तयार होते. तर हेच प्रमाण पावसाळ्यात ९०० लिटरवर जाते.

पाणी वाचवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच जेएनपीटीने वर्षभरापूर्वी ही यंत्रणा बसविलेली आहे. अशा प्रकारची यंत्रणा महाराष्ट्रात मराठवाडय़ासह ११ ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. १२ ते १५ रुपये लिटर दराने पिण्याचे पाणी खरेदी करण्यापेक्षा निसर्गाच्याच शक्तीतून निर्माण करण्यात आलेल्या या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा फायदा सध्याच्या टंचाईच्या काळात जेएनपीटीला होत आहे.
-ए. जी. लोखंडे, मुख्य व्यवस्थापक, जेएनपीटी सार्वजनिक व पाणी विभाग.