नागाव, केगाव किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने शेतीला धोका

उरणच्या अरबी समुद्रालगत पिरवाडी किनारा असून त्याची अनेक वर्षांपासून धूप सुरू आहे. या किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होत असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बंदर विभागाकडे त्याच्या निधीची तरतूदच नसल्याने या बंधाऱ्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे येथील किनारा उद्ध्वस्त होत आहे.

त्याचबरोबर समुद्राचे पाणी येथील शेती तसेच विहिरींपर्यंत पोहचू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही धोका निर्माण झाला आहे. या किनाऱ्याची नुकतीच येथील लोकप्रतिनिधींनी पाहणी केली आहे.

पिरवाडीचा समुद्रकिनारा हा अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथील नारळी व पोफळीच्या झाडांचीही पडझड होत आहे. त्यामुळेही किनाऱ्याचे नुकसान झाले आहे. याच किनाऱ्यावर दोन स्मशानभूमीही आहेत. पावसात या स्मशानभूमीत अंत्यविधी करताना स्मशानभूमीचे खांब जुळवावे लागत आहेत.

नागाव तसेच केगावमधील शेती व विहिरींच्या पाण्यालाही धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत हा बंधारा पूर्ण करावा, असे मत नागावमधील सामाजिक कार्यकर्ते काका पाटील यांनी दिली. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.

अंमलबजावणी होईना

उद्ध्वस्त झालेल्या किनारपट्टीपैकी ४०० मीटर लांबीचा बंधारा बांधण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यानंतर त्याची निविदा काढून बंधारा बांधला जाईल अशी माहिती अनेकदा बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते, प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने शेती व विहिरींच्या पाण्यालाही धोका आहे.