|| सीमा भोईर

पनवेल शहरातील स्थिती; परिसराला कचराभूमीचे स्वरूप; पालिकेच्या दुर्लक्षामुळे सुशोभीकरण नाही

ऐतिहासिक वारसा असलेल्या पनवेल शहरातील तलावांना पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे. देवाळे व लेंडाळे तलाव वगळता इतर तलावांचा परिसर अस्वच्छ झाला आहे. अतिक्रमणं, कचरा व सोडपाण्यामुळे तलावांचा श्वास गुदमरत आहे. देवाळे तलावाप्रमाणे सुशोभीकरणाची मागणी पनवेलकरांकडून होत आहे.

पनवेल शहराला तलावांचा वारसा लाभलेला आहे. कृष्णाळे, वडाळे, इस्रायली (विश्राळे), लेंडाळे, देवाळे हे पाच तलाव आहेत. लेंडाळे व देवाळे तलाव वगळता तीनही तलावांची दुरवस्था झाली आहे. इस्रायली नागरिकांची वस्ती असलेल्या इस्रायली (विश्राळे) तलावाजवळ झोपडय़ांचे अतिक्रमण वाढत असून कपडे धुण्यासाठी वापर होत आहे. देखभाल-दुरुस्ती न केल्याने वडाळे, कृष्णाळे, इस्रायल या तलावांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातील पाणी गढूळ झाले आहे.

शहरात नैसर्गिकरीत्या पाच तलाव असूनही या तलावातील पाण्याचा वापर योग्य नियोजन करून केल्यास पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी केला जावा, असेही पनवेलच्या नागरिकांचे म्हणणे आहे.

तलावांबाहेर अतिक्रमण, खाद्यपदार्थाची दुकाने, तसेच सांडपाण्यामुळे या तलावांचा श्वास गुदमरत आहे. तलावांच्या स्वच्छतेबाबत पालिकेने पुढाकार घ्यावा.   – विश्राम पाटील, रहिवासी

तलावांच्या सुशोभीकरण व स्वच्छतेसंबंधी पालिकेच्या माध्यमातून कामे सुरू करण्यात आली आहेत. देवाळे तलावाचे ८० टक्के काम झाले आहे. इतर तलावांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करू. तलाव क्षेत्रात ज्या झोपडय़ा व दुकाने आहेत त्यांचे पुनर्वसन करून हटविल्या जातील व परिसर मोकळा केला जाईल.  – गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका

कृष्णाळे तलाव : कचराभूमी

या तलाव परिसर कचराकुंडी झाला आहे. चारही बाजूंनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून खाद्यपदार्थाच्या पिशव्या पाण्यात पडलेल्या आहेत. हा शहरातील सर्वात मोठा तलाव असून तो अतिक्रमणामुळे बुजवला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

इस्रायली तलाव : सुशोभीकरण कधी

इस्रायली तलावाचे सुशोभीकरण झाले तर पर्यटनाला चालना मिळू शकते. येथे खुली व्यायामशाळा सुरू केल्यास तरुणांना व्यायामाची आवड निर्माण होऊ  शकते. पोहण्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केल्यास अनेकांना फायदा होऊ  शकतो. पालिकेच्या उत्पन्नातही भर पडू शकते.

वडाळे तलाव : सौंदर्य हरवले

वडाळे तलाव अनेक वर्षांपासून सुशोभित केला जाणार असे सांगितले जाते, मात्र त्याला पालिकेला मुहूर्त मिळत नाही. हा तलाव शहराचे सौंदर्य असून त्याचेच सौंदर्य हरवले आहे. परिसरातील सांडपाणी थेट तळ्यात सोडल्याने तलावाचे पाणीच दूषित झाला आहे.