कारखाने शुक्रवारी सक्तीने बंद
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना विंधण विहिरी खोदण्याची तोंडी परवानगी दिली असली तरी हा प्रकार म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असा असल्याचे मानले जात आहे.
उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही येथील पाणीसंकट कायम असून या समस्येमुळे येथील उद्योजक महिनाभरापासून हैराण झाले आहेत. एमआयडीसीने गुरुवार व शुक्रवार पाणीपुरवठा बंद केल्याने येथील उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेसहाशे कारखाने आहेत. या वसाहतीवरील पाणीसंकटातून राज्याचे उद्योगमंत्री देसाई मार्ग काढतील अशी उद्योजकांना अपेक्षा होती. मागील आठवडय़ात त्याबाबत उद्योजकांनी तसे गाऱ्हाणे उद्योगमंत्र्यांसमोर मांडले. पाणीटंचाई असल्याने येथे विंधण विहिरी खोदाव्यात, असे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सुचविले. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी विंधण विहिरी खोदू नयेत असा अलिखित नियम आजवर पाळण्यात आला आहे.
विंधण विहिरींची परवानगी दिल्यास काही कारखाने बाटलीबंद पाण्याचे छुपे उद्योग सुरू करतील तसेच एमआयडीसीचे उत्पन्न बुडेल, यासाठी हा संकेत होता. मात्र उद्योगमंत्र्यांनीच हा पर्याय सुचविल्याने विंधण विहिरींना परवाने कोण देणार याविषयी उद्योजकांमध्ये चर्चा रंगली आहे. याशिवाय येथील जमिनीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी आहे का, आणि असल्यास कारखान्यांची संख्या पाहता ते किती दिवस पुरेल, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.
या उद्योगांना पाणी मिळावे म्हणून एमआयडीसीच्या जलविभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याचे अनेक प्रयोग वसाहतीमध्ये करण्यात आले, परंतु ते असफल ठरले. या पाणीसंकटामुळे कारखाने शुक्रवारी पूर्णपणे बंद ठेवावे लागत आहेत.