उरणमधील घडणाऱ्या घटनांचा आढावा घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उरणलाइव्ह हा ग्रुप सुरू करण्यात आला असून सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सदस्य असलेल्या या ग्रुपने उरणमधील नागरिकांना पाणी वाचविण्याचे महत्त्व सांगण्यासाठी पाणी वाचवा, पाणी वाढवा व जुनी पाण्याची स्रोते जिवंत करण्यासाठी पुढे या अशी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शहर व गावागावांतून पाणी वाचविण्याचा संदेश देणारी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच जुनी पाण्याची स्रोते शोधून काढून ती जिवंत करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
पाणी कपात सुरू आहे; मात्र मराठवाडय़ासारखी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ उरणमधील नागरिकांवर येणार नाही. कारण तेवढा पाणी साठा आहे. वाढत्या नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे.
उरणमध्ये रानसई, पुनाडे अशी दोन धरणे आहेत तर नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलवाहिन्याही याच तालुक्यातून जातात त्यांच्याकडूनही अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई असली तरी पाणी प्रश्न भीषण नाही. परंतु तो येणार नाही असा विचार करता कामा नये या उद्देशाने उरण तालुक्यातील शहरातील जुन्या विहिरी, तलाव तसेच इतर पाण्याची स्रोते पुन्हा जिवंत करता येतील का त्यासाठी शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येतील,पाणी अडविण्यासाठी काही काम करता येईल का असा विचार करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.