22 November 2019

News Flash

नवी मुंबईतही पाणीकपात?

कमी पावसामुळे मोरबेची पाणी पातळी ४ मीटरने खालावली

कमी पावसामुळे मोरबेची पाणी पातळी ४ मीटरने खालावली

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मात्र जून महिन्यातील पडलेला अत्यल्प पाऊस पाहता पालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले असून पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. यात गेल्या वर्षी जून महिन्यात धरण परिसरात ८८० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र या वर्षी आतापर्यंत फक्त ६२ मि.मी.च पाऊस झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

मागील सलग दोन वर्षे मोरबे धरण भरले आहे. यंदाही चांगला पाऊस झाल्यास धरण भरण्याची हॅट्ट्रिक होण्याची शक्यता आहे; परंतु आतापर्यंत पावसाने हात आखडता घेतल्याने सर्वाचे डोळे पावसाकडे लागले आहेत. २०१७ मध्ये ८ जूनला तर गेल्या वर्षी ३ जूनला पावसाला सुरुवात झाली होती. मोरबे धरण हे ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. धरण पूर्ण भरल्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. गेली दोन वर्षे धरण परिसरात चांगला पाऊस होत असल्याने धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे या वर्षी धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरले एवढा पाणीसाठा आहे. परंतु गेल्या वर्षीपेक्षा धरणातील पाण्याची पातळी आता ४ मीटरने कमी आहे. त्यात आतापर्यंत ६२ मि.मी.पर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. यामुळे भविष्याचा विचार करता सुयोग्य साठा शिल्लक असावा याबाबत नियोजन सुरू आहे.

कमी पाऊस पडत आहे. अधिकाऱ्यांशी बोलून प्रत्यक्ष पाणीकपात करण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील. मोरबे धरणात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी महासभेत सादर करण्यात आलेला प्रस्ताव हा फक्त पाणीपुरवठा दराबाबतच्या माहितीस्तव दिलेला आहे.   -डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

पाणी दरवाढ प्रस्ताव कधी?

शासनाच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ही ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालवण्यात यावी; परंतु पालिकेला पाण्याच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्च १०८.२३ कोटी असून पाणी देयकातून ८०.७० कोटी जमा होत असून २७.५३ कोटी दरवर्षी तूट होत आहे. त्यामुळे पाणी दरवाढीबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार ठेवलेला असताना राजकीय अनास्थेपोटी प्रस्ताव सभेसमोर  येत नसल्याचे बोलले जात आहे.

 

First Published on June 20, 2019 9:49 am

Web Title: water scarcity 16
Just Now!
X