२४ तासांनंतरही कारवाई नाही

पनवेल पालिका कार्यालयाच्या इमारतीमध्ये पाणी पुरवठय़ासाठी हौदावर भरून निघालेला पाण्याचा टॅँकर गाडी धुणाऱ्या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये रिता होताना पकडल्यानंतर २४ तास उलटले तरी पाणी पुरवठा करण्याचा ठेका घेतलेल्या वाहतूक कंत्राटदार कंपनीला पनवेल पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.

पनवेल पालिकेचे आयुक्त या प्रकरणी गंभीर असले तरी संबंधित विभागाचे अधिकारी मात्र कंत्राटदाराच्या बचावाच्या पवित्र्यात असल्याचे समजते. पनवेल शहर पोलिसांनी संबंधित टॅँकरचालकाला बुधवारी ताब्यात घेतले होते.

पनवेल पालिका कार्यालयाची पाणीचोरी दोन नगरसेविकांनी बुधवारी उजेडात आणली होती. सध्या पाण्याची आणीबाणी शहरात सुरू आहे. चार दिवसाआड पाणी मिळणाऱ्या पनवेलकरांनी बुधवारच्या पाणी चोरीच्या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला आहे. पनवेल पालिकेच्या जल विभागाने या प्रकरणी टँकर पुरविणाऱ्या कंपनीला क्षुल्लक कारणे दाखवा नोटीसही बजावली नसल्याचे गुरुवारी उजेडात आले.

या घटनेला २४ तास उलटले तरीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांकडे विचारणा केल्यावर अद्याप पंचनामा पालिकेचे अधिकारी करत असून गुन्हा दाखल झाल्यावर अधिक माहिती देऊ असे सांगण्यात आले.

पनवेल शहराला १९ दश लक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज आहे. देहरंग धरणाने तळ गाठल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) पनवेलकरांची उसनवारीने तहान भागविली जाते. ‘एमजेपी’ रसायनी येथील पाताळगंगा नदीतून मिळालेले पाणी पनवेल शहराला देते. पाताळगंगा नदीतील पाण्याची पातळी टाटा पॉवर कंपनीच्या प्रकल्पावर अवलंबून आहे. मागील अनेक दिवसांपासून १० ते ११ एमएलडी पाणी पनवेल शहराला मिळत आहे. दररोजची सुमारे आठ एमएलडीची तूट भरून काढण्यासाठी शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी झोनिंग पद्धतीने दिले जाते. सध्या पाताळगंगा नदीतही कमी पाणी असल्याने प्रत्यक्षात पाणी खेचण्यासाठी दुप्पट मोटारपंपाने पाणी खेचले जाते. तरीही पनवेलकरांना १० एमएलडीहून कमी पाणी दररोज मिळत असताना आशा प्रकारे पाणी चोरी होत असताना प्रशासन गंभीर नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाण्याची चोरी झाल्याचे समजताच मी स्वत: आयुक्तांच्या सूचनेनंतर तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. टॅँकर पुरविणारे कंत्राटदार या पाणी चोरीत सामील असतील असे प्रथमदर्शनी दिसत नाही. अद्याप कोणतीही नोटीस वाहतूक कंत्राटदार कंपनीला देण्यात आलेले नाही. मी मुंबईत पालिकेच्या कामानिमित्त असल्याने तेथे आल्यावर कागदपत्र पाहील्यावर याबद्दल भूमिका स्पष्ट करता येईल.    -उल्हास वाड, जल अभियंता, पनवेल पालिका