19 October 2019

News Flash

पनवेलकरांना पाण्याची भ्रांत

एक दिवसाआड अर्धा-पाऊण तास पाणीपुरवठा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| सीमा भोईर

एक दिवसाआड अर्धा-पाऊण तास पाणीपुरवठा

डिसेंबरच्या मध्यावरच पाणीकपात लागू झाल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या पनवेलकरांच्या समस्येत गेल्या काही दिवसांत आणखी भर पडली आहे. एक दिवसाआड दोन तास येणारे पाणी आता अवघा अर्धा ते पाऊण तास येऊ लागले आहे. एवढय़ा तुटपुंजा पाण्यात घरातील कामे कशी करायची, असा प्रश्न आता पनवेलकरांना पडू लागला आहे.

दरवर्षी १ फेब्रुवारीपासून लागू होणारी पाणीकपात यंदा १३ डिसेंबरलाच सुरू झाली. एक दिवसाआड तेही फक्त दोन तासांसाठीच पाणी सोडले जाऊ लागले, मात्र आता ही वेळ घटवून एका तासावर आणण्यात आली आहे. त्यातही प्रत्यक्षात अवघा अर्धा ते पाऊण तास पाणीपुरवठा होतो. महासभेत प्रश्न मांडूनही पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे.

पनवेलमधील देहरंग धरण पालिकेच्या मालकीचे आहे. धरणाची साठवण क्षमता ३.५७ दशलक्ष क्युबिक मीटर (एमसीएम) आहे. मात्र पनवेल शहराला रोज २६ ते २८ दशलक्ष लिटर पाणी लागते. देहरंग धरणातून रोज सुमारे १२ दशलक्ष लिटर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ७ दशलक्ष लिटर व सिडकोकडून ०.५० दशलक्ष लिटर असा एकूण २६.५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. देहरंग धरणात पाणीसाठा वाढणार असल्याचे आमिष नागरिकांना दाखवले जात आहे. देहरंग हे ५० वर्षांपूर्वीचे धरण असून दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात धरणाची गळती थांबवण्याचे काम सुरूकरण्यात आले होते. या धरणाचा बंधारा जुना कोल्हापुरी पद्धतीचा असल्याने त्याची दुरुस्ती केल्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे, असे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. २५० एमएलडी पाण्याची शहराला गरज आहे, मात्र फक्त २१० एमएलडी पाणी मिळते. शहराला ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासते.

न्हावा शेवाकडून २२८ एमएलडी पाणी मिळवण्यासाठी मुख्य जलवाहिनीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता २०० कोटी रुपये अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे, उर्वरित रक्कम सिडको, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे पालिकेने सांगितले. पनवेल शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले होते. पनवेल एसटी स्थानकाजवळील पाण्याची टाकी जुनी झाल्यामुळे त्यातही पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुधारणा करण्यात आली आहे, मात्र तरीही पनवेलकरांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे.

पाणी येते तेव्हा पहिली १०-१५ मिनिटे अतिशय कमी दाबाने पुरवठा होतो. केवळ हवा जात राहते. दरवर्षी उन्हाळ्यात मागविण्यात येणारे टँकर यंदा आताच मागवावे लागत आहेत. लग्नसराई व कौटुंबिक समारंभ टँकरशिवाय पार पडतच नाहीत, त्यामुळे पनवेलकरांतून नाराजी व्यक्त होत आहे.

१३ डिसेंबर पूर्वी रोज दीड तास पाणी येत असे. आता एक दिवसाआड अर्धा ते पाऊण तास तेसुद्धा कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे पाणीकपातीचे गंभीर परिणाम पनवेलकरांना सहन करावे लागत आहेत.  – गौरव पवार, रहिवासी, पनवेल

एका तासाव्यतिरिक्त वाढीव १० मिनिटे पाणी सोडले जाते, मुळातच पाणी कमी असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी रीतसर तक्रार करावी.    – आर. आर. तायडे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग

 

First Published on January 8, 2019 12:58 am

Web Title: water scarcity in navi mumbai 10