कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ३ येथील एलआयजीच्या बैठय़ा वसाहतीमधील रहिवाशांना १५ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या रहिवाशांना दिले होते, मात्र मंगळवारीही पाणीटंचाईची परिस्थिती ‘जैसे थे’ होती.
या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी काही रहिवाशांनी मंगळवारी सिडकोवर मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली, मात्र सध्याच्या उत्सवी दिवसात पोलिसांवर बंदोबस्ताची अतिरिक्त जबाबदारी असल्याने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. या पाश्र्वभूमीवर कळंबोली ग्रामपंचायतीने तातडीची उपाययोजना म्हणून या वसाहतीत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पावसाळ्याचे पाणी साठू नये म्हणून सिडकोने रस्त्यांची व गटारांची उंची-खोली वाढवली. परंतु यामुळे येथील घरांपेक्षा रस्ते व गटारे उंच झाली. सखल भागांतील या घरांच्या तळाशी जलवाहिन्या व मलनिसारण वाहिन्या दबल्या गेल्याने कमी दाबाने पाणी येत आहे. याप्रकरणी आमचे प्रयत्न सुरू असून एमजेपीकडून काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ही समस्या उद्भवली आहे. मात्र लवकरच यातून मार्ग निघेल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बोडके यांनी सांगितले.
जलवाहिनी
बदलणार कधी?
एलआयजी आणि केएल-१ या बैठय़ा वसाहतींमधील जलवाहिन्या २० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे सिडकोने रहिवाशांच्या घरापर्यंतची जलवाहिनी बदलून दिल्यास या प्रश्नी मार्ग निघू शकेल. सिडकोने काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या समस्येमुळे सीबीडी-बेलापूर येथील वसाहतींमधील अंतर्गत जलवाहिन्या बदलून दिल्या होत्या. कळंबोलीकरांसाठी तोच न्याय लावून बैठय़ा वसाहतींच्या अंतर्गत जलवाहिन्या बदलून दिल्यास दूषित पाण्यासह कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकेल.