सिडकोला जाब विचारला

सिडको प्रशासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीत समावेश असणाऱ्या कामोठे वसाहतीमधील रहिवासी अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या रहिवाशांनी सोमवारी अखेर सिडकोच्या बेलापूर येथील पाणीपुरवठा विभागातील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यात गृहिणींचाही मोठय़ा प्रमाणात समावेश होता.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर १८ येथील अहिंसा गृहनिर्माण सोसायटीमध्ये महिनाभरापासून पाणी येत नाही. या सोसायटीमध्ये २१० सदनिका व ५८ गाळे आहेत. सध्या येथील रहिवासी पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा उपयोग करतात. हे रहिवासी अनेक दिवसांपासून कामोठे वसाहतीमधील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. परंतु पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने आम्हीही हतबल असल्याचे उत्तर अधिकारी देत आहेत. या रहिवाशांनी सोमवारी सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयात जाऊन जाब विचारण्याचे ठरवले. या विभागातील अधिकाऱ्यांनी रहिवाशांचा संतप्त अवतार पाहून पाणीपुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल असे उत्तर देऊन जमावाला पिटाळण्याचा प्रयत्न केला. परंतु सिडकोचे एक अधिकारी कामोठेमध्ये भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतीमधील हॉटेलमालकांना अवैधपणे पाणीपुरवठा करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. तसेच जलवाहिनी फोडून पाणीचोरी होत असल्याचे छायाचित्रही सिडकोच्या अधिकाऱ्यांना यावेळी दाखवले. यावर वरमलेल्या सिडको अधिकाऱ्यांना तुमच्या सोसायटीत यापुढे नक्की पाणी येईल, असे आश्वासन अहिंसा सोसायटीच्या रहिवाशांना दिले. अहिंसा सोसायटीप्रमाणे सेक्टर १७ येथील जिजाऊ गृहनिर्माण सोसायटीमधील २०० सदनिकांमधील रहिवासीही पाणीटंचाईने त्रस्त आहेत.

विमानतळ महत्त्वाचे
कामोठे वसाहतीचा पाणीप्रश्न पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हातात घेतला आहे. त्यांनी सिडको भवनासमोर आंदोलन केल्यानंतरही कामोठेची पाणीसमस्या कायम आहे. सिडको पाणीप्रश्नावर गंभीर नसून सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प पाण्यापेक्षा महत्त्वाचा वाटत असल्याने ही वेळ आली आहे, असा आरोप होत आहे.