उरणमधील भुऱ्याची आणि खैरकाठी या दोन वाडय़ांवर पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे येथील महिलांना रात्रभर हातपंपावर पाण्यासाठी जागरण करावे लागत होते. याची माहिती घेऊन काही सामाजिक संस्थांनी प्रशासनाला आदिवासी वाडय़ांवर टँकरने पुरवठा सुरू करण्यास भाग पाडले; मात्र उरण तालुका जिल्ह्य़ात टँकरमुक्त तालुका असल्याने सुरू करण्यात आलेला पाण्याचा टँकर बंद करण्यात आला आहे.

आदिवासी पाडय़ांवर टंचाई आहे. यासाठी सामाजिक संस्था आणि पत्रकारांनी या वाडीला स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखविली आणि याची माहिती प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनानेच दखल घेत तातडीने वाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे येथील ७० घरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. मात्र गेली अनेक वर्षे तालुका कागदोपत्री टँकरमुक्त असल्याचे स्पष्ट करीत टँकर बंद केला व पुन्हा पाणी पुरवठा पूर्ववत केला.