पनवेलमध्ये सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने शुक्रवारी घेतला. जोवर पुरेसा पाऊस होत नाही, तोवर ही कपात सुरू राहणार आहे.

देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), सिडको, एमआयडीसी यांच्याकडून शहराला पाणीपुरवठा होतो. देहरंग धरणातील पाणी मार्चपर्यंत बहुतांश कमी झालेले असते. गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. दोन टप्प्यांत पाण्याचा पुरवठा केला जाईल. पहिल्या टप्प्यात लाइन आळी, परदेशी आळी, कापडबाजार, शिवाजी चौक, रुपाली सिनेमा, भाजी मार्केट, पंचरत्न हॉटेल, विश्राळी नाका हे परिसर, रोहिदास वाडा, लक्ष्मी आय रुग्णालयाचा परिसरा आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अशोकबाग परिसर, पायोनियर सोसायटी, हरिओम नगर, एचओसी कॉलनी, गजानन सोसायटी, प्रांत कार्यालय, ठाणा नाका, पाटकर वाडा, साईनगर, बुशेरा पार्क, तक्का गाव-कॉलनी, मिडलक्लास सोसायटी हा परिसर असेल. याच वेळी नगरपालिकेने शहरातील जुन्या विहिरींमधील गाळ काढण्याचा निर्णय गेल्याच आठवडय़ात घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे.